
राज ठाकरे महाविकास आघाडीसोबत गेले तर…
शिवसेना ठाकरे गट आणि नवनिर्माण सेना यांच्यातील संभाव्य युतीचे कयास बांधले जात असताना रविवारी राज ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
मुंबईतील मातोश्री निवासस्थानी झालेल्या या भेटीदरम्यान राज यांच्याबरोबर त्यांच्या आईदेखील उपस्थित होत्या.
राज्यात आगामी काळात मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची ही भेट अतिशय महत्त्वाची मानली जात आहे.
या भेटीमुळे दोन्ही पक्षांतील युतीची शक्यता अधिकच बळावली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून मनसेबरोबरच्या युतीबद्दल सातत्याने सकारात्मक विधाने केली जात आहेत. यावर विविध राजकीय पक्षाकडून टिप्पणी केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर भाजप पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राज आणि उद्धव ठाकरे भेटीवर महत्त्वपूर्ण विधान केले.
सध्याच्या निवडणूक प्रक्रियेवर काही शंका असल्याने त्यावर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ मंगळवारी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसेचे प्रमुख राज ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा शिष्टमंडळात समावेश असेल. महाविकास आघाडीच्या नेत्यांबरोबर राज ठाकरे सहभागी होणे हे महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे राज ठाकरे महाविकास आघाडी सोबत जाणार का अशीही चर्चा रंगली आहे. गेल्या आठवड्यातही
ठाकरे बंधूंची भेट
गेल्या आठवड्यातही राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेकांची भेट घेतली होती. त्यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये झालेली बैठक ही राजकीय असल्याचे शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी सांगितले होते. इतकेच नाही, तर मनसे आणि शिवसेना यांच्यातील जागावाटपाची चर्चा अंतिम टप्यात असल्याची माहितीही त्यांनी माध्यमांना दिली होती. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेची साथ मिळावी यासाठी सध्या शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे. १९९७ मध्ये एकसंध शिवसेनेने भाजपाबरोबर युती करून पहिल्यांदाच मुंबई महापालिकेवर आपल्या पक्षाचा झेंडा फडकवला होता.
काय म्हणाले मुख्यमंत्री
कोण कोणाला भेटत आहे, कोण कोणासोबत जाणार आहे, या गोष्टी आमच्या दृष्टीने फार महत्त्वाच्या ठरत नाही. महाराष्ट्रासाठी कोण काम करतोय, कोण या राज्याचे नेतृत्व करू शकतो, हे जनतेला चांगले माहिती आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये राज्यातील जनता महायुतीला विजयी करणार आहे. संपूर्ण राज्य आमच्या पाठीमागे असून पुन्हा एकदा महापालिका आणि जिल्हा परिषदांवर भगवा फडकणार आहे. विधानसभेप्रमाणेच या निवडणुकीतही भाजप आणि मित्र पक्षांना यश मिळणार आहे. त्यामुळे कोणाच्या भेटीचा किंवा कुठे जाण्याचा आमच्यावर काहीही परिणाम होणार नाही असे मुख्यमंत्री म्हणाले.