
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता, पक्षांतरांची लाट आणखी वाढण्याची शक्यता आहे.
महायुतीत आपला पक्ष बळकट करण्यासाठी प्रवेशयात्रांची चढाओढ सुरू झाली आहे. यवतमाळ-वणीमध्ये शिवसेना (शिंदे गट) ने आपलाच मित्रपक्ष असलेल्या भाजपलाच मोठा धक्का दिला आहे. भाजप नेते विजय चोरडीया आणि ऍड. कुणाल चोरडीया यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. या घडामोडीमुळे आगामी निवडणुकांत भाजप अडचणीत येण्याची चिन्हे आहेत.
काही वर्षांपूर्वी राजकारणात विचारधारा आणि वैचारिक निष्ठेला मोठे महत्त्व दिले जात असे. मात्र अलीकडच्या काळात या गोष्टींचा महत्त्व कमी झाल्याचे दिसते. राजकीय महत्वकांक्षा आणि अपूर्ण इच्छा यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहज एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत.
मागील तीन-चार वर्षांत पक्ष बदलाचा प्रवाह अधिक वाढल्याचे निरीक्षणात आले आहे. विशेषतः मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर हे बदल अधिक स्पष्ट झाले आहेत. यामध्ये महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार यांच्या पक्षाला सर्वाधिक फटका बसल्याचे पाहायला मिळते. दोन्ही पक्षांतून मोठ्या प्रमाणात पदाधिकारी आणि कार्यकर्ते फुटून बाहेर पडले आहेत.
शिवसेनेला धक्का देण्यासाठी भाजपाची तयारी
तर दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींमध्ये मोठा उलथापालथ घडली आहे. माजी जिल्हा संपर्क प्रमुख आणि शिवसेनेचे पदाधिकारी शिवाजीराव सावंत यांनी नुकताच राजीनामा दिला असून, त्यामुळे शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. याच पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अकलुज येथील श्रीपूरमध्ये सावंत यांची भेट घेण्याचा निरोप दिला आहे. आजच्या बैठकीत सावंतांच्या भाजपमध्ये प्रवेशाचा मुहूर्त ठरवला जाणार आहे. सावंत हे माजी मंत्री तानाजी सावंत यांचे सख्खे भाऊ असून, या निर्णयामुळे सोलापूरमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री फडणवीस आज सोलापूरला येणार आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी त्यांच्या होमग्राऊंड असलेल्या सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते सातारा जिल्ह्याचे शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. दौऱ्याचे नेटके नियोजन सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे.जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये पक्षीय पातळीवर स्वबळावर होणार की महायुती किंवा महाविकास आघाडीमार्फत लढवल्या जाणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. तरीही महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे.