
निवडणूक आयोगाच्या कारभाराचे वाभाडे काढले…
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडी आणि त्यांच्यासोबत इतर विरोधी पक्ष मतदार याद्यातील घोळाच्या मुद्यावर एकत्र आले आहेत. काल निवडणुक आयोगाकडे गेलेल्या शिष्टमंडळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी परखडपणे आपले मुद्दे मांडत अधिकाऱ्यांना घाम फोडला. त्यानंतर आज महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेतही राज ठाकरे यांनीच आपली छाप पाडली.
लांबत चाललेल्या पत्रकार परिषदेत मतदार याद्यांमधील त्रुटी निवडणूक आयोगाने दूर कराव्यात, त्यात पारदर्शकता आणावी, मगच निवडणूका घ्यावात, अशी प्रमुख मागणी करत त्यांनी प्रश्नांना आवर घातला. स्वतंत्रपणे पत्रकार परिषद घेऊन आपल्याला जे बालायचे ते सांगून निघून जाणारे राज ठाकरे आज मात्र मविआच्या नेत्यांसोबत काहीसे अवघडलेले वाटले. पत्रकारांच्या प्रश्नांना प्रत्येक नेता लांबलचक उत्तर देत असल्याने नेत्यांची संख्या आणि पत्रकारांच्या प्रश्नांचा अंदाज घेत राज ठाकरे यांनी मूळ मागणी मांडत पत्रकार परिषदच संपवली.
राज ठाकरे यांनी आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून पत्रकार परिषदेत त्यांनी मांडलेले मुद्दे पुन्हा समोर आणले. या संदर्भात सविस्तर पोस्ट करत राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला रोखठोक प्रश्न केले आहेत. मागच्या वर्षी झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या सार्वत्रिक निवडणुकांपासूनच, राज्य निवडणूक आयोगाच्या पारदर्शीतेबद्दल लोकांच्या आणि राजकीय व्यवस्थेच्या मनावर शंकेचं सावट आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका यातरी किमान पारदर्शी व्हाव्यात आणि निवडणूक आयोग खरंच स्वायत्त आहे हे दिसलंच पाहिजे.
पण आत्ता निवडणूक आयोगाच्या कारभारात काही त्रुटी आहेत. या त्रुटी दूर व्हायलाच पाहिजेत, त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पारदर्शी व्हायला पाहिजेत असं वाटणाऱ्या सगळ्या नेत्यांचं शिष्टमंडळ गेले दोन दिवस निवडणूक आयोगाला भेटत होतो. आम्ही आमचं आणि जनतेचं म्हणणं निवडणूक आयोगासमोर मांडलं. त्यानंतर आम्ही सर्वानी माध्यमांशी संवाद साधला.
निवडणूक आयोग केवळ निवडणूक घेतात आणि राजकीय पक्ष निवडणूका लढवतात, मग राजकीय पक्षांना जर निवडणूक आयोग मतदार याद्या दाखवत नसेल तर पहिला घोळ इथे आहे. 2024 मध्ये ज्या निवडणुका झाल्या त्याआधीच्या यादीत मुलांच्या वयापेक्षा वडिलांचे वय कमी कसे? 2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतरच्या मतदारयादीत अनेक मतदारांची नावं आहेत मात्र फोटो नाहीत. राज्य निवडणूक आयेगाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यावर त्यांनी याची जबाबदारी केंद्रीय निवडणूक आयोगावर ढकलली.
आधी सुधारणा, मग निवडणुका..
जोपर्यंत मतदार याद्यांमध्ये पूर्णपणे सुधारणा होत नाही तोपर्यंत निवडणूका घेऊ नका, अशी मागणी आम्ही निवडणुक आयोगाकडे केली आहे. त्यावर निवडणूक आयोग काय निर्णय घेतं ते पाहू आणि आम्ही पुढचा निर्णय घेऊ. जेव्हा खोट्या यादीची बातमी माध्यमांवर येते नंतर संबंधित नावं मतदार यादीतून गायब होतात. त्याबद्दल निवडणूक आयोगाला माहिती नाही. जी नावं निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरून गायब झाली त्याची माहिती आयोगाकडे नसेल तर ती नावं कोण काढतंय आणि नवी नावं कोण टाकतंय याचा तपास करावा लागेल.
आपण कोणाला मतदान करतो हे गोपनिय असतं, मतदार कसे गोपनीय असतील? मतदान केंद्रावर लावलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज निवडणूक आयोग बघू शकतं मग आम्ही का नाही बघू शकत? या सगळ्या गोष्टींमध्ये निवडणूक आयोग लपाछपी का करतंय? हेच मला कळत नाहीये. 2022 च्या यादीत जाहीर केलेल्या यादीमध्ये मतदारांचे फोटो आहेत, मग आत्ता जाहीर केलेल्या यादीतून मतदारांचे फोटो का काढून टाकले? हा घोळ निवडणूक आयोग का करतंय?
या देशातील ही पहिली निवडणूक नाही, याआधीच्या कोणत्याही निवडणूकीच्या वेळेस असे मुद्दे आले नाहीत मग, हे या निवडणूकीच्या वेळीच का आले? निवडणूक यादीत घोळ आहेत, ते घोळ आम्ही राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे ठेवलेले आहेत. त्यावर निवडणूक आयोगाने कार्यवाही करून घोळ सोडवावेत इतकीच आमची इच्छा आहे.
या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या 232 जागा निवडून आल्या तरीही महाराष्ट्रात शांतता होती. कोणीही जल्लोष केला नाही हे कसलं द्योतक आहे? असा सवाल राज ठाकरे यांनी केला. 2019 मध्ये याच विषयावर मी पत्रकार परिषद घेतली होती, त्यावेळीही राज्यातील सर्व विरोधी पक्षांचे नेते पत्रकार परिषदेत सहभागी होते. त्यावेळी अजित पवारही तिथे उपस्थित होते. त्यांनीही आज यायला हवं होतं, असा टोलाही राज ठाकरे यांनी शेवटी लगावला.