
माझ्या अंगाला…
राज्य निवडणूक आयोगासोबत बैठक झाल्यानंतर महाविकास आघाडीमधील प्रमुख नेत्यांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर आणि एकूणच निवडणूक प्रक्रियेवर सडकून टीका केली.
तसेच विधानसभा निवडणुकीच्या निकालावरही त्यांनी जोरदार टीका केली. महायुतीने २३२ जागा जिंकल्या असल्या तरी, संपूर्ण महाराष्ट्रात एक प्रकारचा सन्नाटा पसरला होता. पराभूत झालेल्यांना धक्का बसतोच पण या निवडणुकीत विजयी झालेल्यांना सुद्धा धक्का बसला होता, हे असामान्य आहे, असे राज ठाकरे म्हणाले.
त्याचवेळी राज ठाकरेंना ‘तुम्ही महाविकास आघाडीसोबत एकत्र दिसत आहात’ असा प्रश्न विचारला असता, ते म्हणाले, “२०१७ सुद्धा मी हेच बोलत होतो, त्यावेळेस अजित पवार सुद्धा होते. खरं तर त्यांनी सुद्धा आज यायला हवे होते, त्यावेळेला ते तावातावाने बोलत होते” हे म्हणताना राज ठाकरे यांनी अजित पवारांची मिमिक्री केली. आता राज ठाकरे यांच्या या मिमिक्रीवर स्वतः अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
पुण्यात आज माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्या मिमिक्रीवर उत्तर दिले आहे. ते म्हणाले, ‘उद्या तू जरी माझी मिमिक्री केली तरी माझ्या अंगाला भोकं पडत नाहीत. मिमिक्री करणारे मिमिक्री करत राहतील मी कामाचा माणूस आहे. मी काम करत राहील. मी माझ्या शेतकऱ्यांकरता महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
मिमिक्री कोण करतय हे आपण ओळखून घेतलं पाहिजे. उद्या तुम्ही उठून त्यांना विचारणार का ओ राजसाहेब ठाकरे तुम्ही मिमिक्री केल्यावर अजित पवार असं-असं म्हणाले. मला याच्याशी घेणं देणं नाही. मला माझ्या बळीराजाला दिवाळीच्या पूर्वी ताबडतोब कशी मदत मिळेल, शेतकऱ्यांना पुन्हा कसं उभं करता येईल हे पाहायचं आहे. हे काम आम्ही करत आहोत आणि ते करत राहू’ असं अजित पवार म्हणाले आहेत.