
हाणामारीनंतरचा रुग्णालयातील फोटो व्हायरल !
मुंबई एसटी को-ओपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत काल (बुधवारी) मोठा राडा झाला. अॅड.गुणरत्न सदावर्ते आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली.
या हाणामारीचा व्हिडिओ देखील समोर आला होता. दरम्यान, या घटनेच्या काही तासानंतरच सदावर्ते यांच्या दोन्ही दोन्ही पाय आणि दोनही हाताला प्लास्टर केल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या फोटोमध्ये सदावर्ते हे रुग्णालयातील बेडवर झोपलेले दिसत आहेत. त्यांच्या दोन्ही हात आणि पायाला प्लॅस्टर असून त्यांना सलाईन देखील लावण्यात आलेली आहे. त्यांच्या पत्नी अॅड.जयश्री पाटील या देखील या फोटोमध्ये दिसत आहेत. दरम्यान, या फोटोच्या सत्यतेची पुष्टी ‘सरकारनामा’ करत नाही.
या फोटोवर नेटकऱ्यांनी उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. जे झाले ते अयोग्य आहे असे काही नेटकरी म्हणत आहेत तर, या मारहाणीनंतर सदावर्तेंना काही नेटकऱ्यांनी ट्रोल केले असून ते नाटक करत असल्याचेही म्हटले आहे. राज ठाकरेंसोबत फोटो असलेल्या आनंद सोनी यांच्या अकाऊंटवरून हा फोटो शेअर करण्यात आला आहे. दरम्यान, काही नेटकऱ्यांनी हा फोटो खरा नसून एआयच्या माध्यमातून तयार केला असल्याचे म्हटले आहे.
हल्ल्यामागे सदावर्तेंच्या हात…
एसटी बँकेचे संचालक संतोष राठोड यांनी सांगितले की, एसटी बँकेत कोट्यावधीचा गैरव्यवहार झाला आहे. आम्ही त्याची तक्रार सहकार आयुक्त आणि अध्यक्षांकडे केली आहे. कोट्यवधीचा गैरव्यवहार हा सदावर्ते हे करत असून बैठीत झालेला गोंधल आणि हल्ल्यामागे सदावर्तेंचा हात आहे.
महिलांचा अपमान
एसटी बँकेचे सदावर्ते पॅनलचे संचालक संजय घाटगे यांनी सांगितले की, बैठकीत विरोधी संचालकांनी महिलांचा अपमान केला. मंगळसुत्र तोडण्याचा प्रयत्न केला. कपडे फाडण्यात आले, जातीवाचक बोलले गेले. वारंवार महिलांचा अपमान करण्यात आला.