
भारताकडे मागितली मदत; म्हणाले आपण आता…
गेल्या काही काळापासून अमेरिकाभारतावर विविध कारणांवरून (उदा. आयात शुल्क, रशियाकडून तेल खरेदी) दबाव आणत होता. मात्र, आता चीनने अमेरिकेची ‘दुखती नस’ दाबल्यामुळे, अमेरिकेने नरमाईची भूमिका घेतली आहे.
भारतावर दबाव टाकणाऱ्या राष्ट्राध्यक्ष ट्रम्प भारताकडून मदतीची अपेक्षा करत आहे. चीनने ‘रेअर अर्थ एलिमेंट्स’च्या निर्यातीवरील निर्बंध आणखी कठोर करण्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे अमेरिका प्रचंड अस्वस्थ झाला आहे.
चीनने ‘रेअर अर्थ’ निर्बंधांची यादी वाढवली
‘रेअर अर्थ’ हे असे दुर्मिळ धातू आहेत, जे स्मार्टफोनपासून इलेक्ट्रिक वाहने, विंड टर्बाइन आणि संरक्षण उपकरणांपर्यंत अनेक अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये वापरले जातात. चीनने यापूर्वी एप्रिलमध्ये सात ‘रेअर अर्थ’च्या निर्यातीवर बंदी घातली होती, ज्यात सॅमेरियम, गॅडोलीनियम, टेरबियम, डिस्प्रोसियम, ल्यूटेटियम, स्कँडियम आणि यट्रियम यांचा समावेश होता. आता चीनने या यादीत आणखी पाच दुर्मिळ धातूंचा समावेश केला आहे, ज्यात होल्मियम, अर्बियम, थुलियम, युरोपियम आणि यटरबियम यांचा समावेश आहे.
अमेरिकेचे चीनवर प्रचंड अवलंबित्व
चीनच्या या निर्णयामुळे अमेरिका आणि जगातील इतर अनेक देशांवर मोठा परिणाम होणार आहे. अमेरिका आपल्या ७० टक्क्यांहून अधिक ‘रेअर अर्थ’ची आयात चीनमधून करतो. चीनच्या या भूमिकेने अमेरिकेला प्रचंड चिंता वाटू लागली आहे. चीनच्या या निर्बंधांवर सुरुवातीला अमेरिकेने चिनी उत्पादनांवर १०० टक्के आयात शुल्क लावून प्रत्युत्तर दिले. मात्र, आता अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी या प्रकरणी भारताकडे मदतीची मागणी केली आहे.
अमेरिकेने भारताकडे का मागितली मदत?
सीएनबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत अर्थमंत्री बेसेंट म्हणाले, “आम्ही युरोपियन मित्रदेश, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, भारत आणि आशियाई देशांसोबत चर्चा करू. चीनच्या या पावलाविरोधात आम्ही सर्वजण मिळून आमची प्रतिक्रिया देऊ.” बेसेंट यांच्या मते, चीनचा हा निर्णय केवळ अमेरिकेसाठीच नव्हे, तर जगभरातील अनेक देशांसाठी चिंतेचा विषय आहे. ‘रेअर अर्थ’चा पुरवठा जगभरात कायम राहावा, यासाठी सर्वांनी मिळून काम करणे आवश्यक आहे.
भारत आधीच अमेरिकेसोबत ‘रेअर अर्थ’ सहकार्यात सहभागी
भारत आधीच ‘रेअर अर्थ’च्या पुरवठा साखळीत विविधता आणण्याच्या अमेरिकेच्या प्रयत्नांमध्ये सामील झाला आहे. २०१३ मध्ये, भारत औपचारिकपणे ‘मिनरल्स सिक्युरिटी फायनान्स नेटवर्क’ या संघटनेचा भाग बनला आहे. ही अमेरिकेच्या नेतृत्वाखालील एक संघटना आहे, जिचा उद्देश ‘रेअर अर्थ’च्या पुरवठा साखळीला सुरक्षित करण्यासाठी सदस्य देशांमध्ये सहकार्य वाढवणे हा आहे.
चीनच्या या रणनीतिक खेळीमुळे ‘रेअर अर्थ’ जागतिक भू-राजकारणातील एक महत्त्वाचा घटक बनला आहे आणि यात भारताची भूमिका निर्णायक ठरू शकते.