
दोन्ही देशांत होणार मोठी डील; शेतकऱ्यांना ठरणार फायदेशीर…
अमेरिकेने लादलेल्या टॅरिफमुळे भारतासहित जगभरातील देशांच्या व्यापारावर परिणाम झाला आहे. मात्र त्यानंतरच भारताचा आपला जुना मित्र रशियासोबत व्यापार वाढत आहे. लवकरच एक मोठा करार होण्याची शक्यता आहे.
ज्याचा फायदा भारतातील शेतकऱ्यांना होणार आहे. रशिया दरवर्षी 3 लाख ते 5 लाख मेट्रिक टन भारतीय केळी स्वीकारण्यास तयार आहे. रशियाच्या अन्न सुरक्षा नियामक संस्थेने बुधवारी एक निवेदन जारी केले. या निवेदनात म्हटले आहे की, भारत रशियन बाजारपेठेत केळीचा पुरवठा वाढवू शकतो.
इतर उत्पादने निर्यातीवर चर्चा
Rosselkhoznadzor च्या प्रेस सेवेनुसार, संस्थेचे प्रमुख सर्गेई डॅनकव्हर्ट यांनी भारतीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्रालय तसेच वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. या चर्चेत भारत आणि रशिया यांच्यातील कृषी उत्पादनांचा परस्पर पुरवठा वाढवण्याच्या संधींवर चर्चा झाली. यामध्ये भारताकडून कोळंबी आणि मासे उत्पादने तसेच इतर भारतीय फळे आणि भाज्यांसाठी रशियाच्या बाजारपेठेत प्रवेश मिळवण्यावरही चर्चा झाली.
केळी आयातीवर रशियाचं निवेदन
“आम्ही भारताच्या केळी निर्यातीत वाढ करण्याच्या शक्यतेवरही भर दिला,” असे निवेदनात म्हटले आहे. Rosselkhoznadzor रशियाला फळे पुरवणाऱ्या देशांचे भौगोलिक विविधीकरण करण्यास इच्छुक आहे. रशिया दरवर्षी अंदाजे 300000 ते 500000 टन भारतीय केळी स्वीकारण्यास तयार आहे, असे प्रेस स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे. भारताचा केळी उत्पादनात जगात पहिला क्रमांक लागतो. भारताचे वार्षिक उत्पादन 33 दशलक्ष टन आहे.
डिसेंबरमध्ये पुतिन भारत भेटीवर
“परस्पर हितसंबंध लक्षात घेता, दोन्ही पक्षांनी 16 ऑक्टोबर रोजी सक्षम प्राधिकरणांमध्ये तांत्रिक सल्लामसलत सुरू ठेवण्याचे मान्य केले आहे. यामध्ये केळी निर्यातीसाठीच्या आवश्यकतांसह वनस्पती आरोग्यविषयक मुद्द्यांचा समावेश असेल, असे एजन्सीच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. यापूर्वी, राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात नवी दिल्ली भेटीपूर्वी भारतासोबतच्या व्यापार असंतुलन कमी करण्यासाठी सरकारने पावले उचलावीत असे आदेश दिल्याचे जाहीर केले होते.