
आयसीसी टी20 वर्ल्डकप स्पर्धा दर दोन वर्षांनी आयोजित केली जाते. आता टी20 वर्ल्डकप स्पर्धा 2026 या वर्षी होणार आहे. या स्पर्धेचं यजमानपद भारत आणि श्रीलंकेकडे आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे.
महिनाभर ही स्पर्धा असणार असून 20 संघ या स्पर्धेत लढत देणार आहेत. या स्पर्धेसाठी काही संघ आधीच निश्चित झाले होते. तर काही संघांची वर्णी ही पात्रता फेरीतून झाली आहे. आशिया आणि पूर्व आशिया पॅसिफिक फेरीतून तीन जागा होत्या. नेपाळ आणि ओमान यांनी आधीच स्थान मिळवलं होते. तर एका जागेसाठी तीन संघांमध्ये चढाओढ सुरु होती. आता या ती जागा भरल्याने टी20 वर्ल्डकप स्पर्धेचे 20 संघ निश्चित झाले आहे. पात्रता फेरीतून युएई हा स्पर्धेत जागा मिळवणारा 20वा संघ ठरला आहे. जापानला पराभूत करत युएईने आपली जागा पक्की केली आहे.
या स्पर्धेत कोणत्या संघाला कशी जागा मिळाली?
भारत आणि श्रीलंका यांच्याकडे यजमानपद असल्याने त्यांना या स्पर्धेत थेट एन्ट्री मिळाली. तर टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेत टॉप सात संघांना या स्पर्धेत निश्चित झाली होती. यात अफगाणिस्तान, बांग्लादेश, इंग्लंड, दक्षिण अफ्रिका, अमेरिका आणि वेस्ट इंडिज या संघांचा समावेश होता. तर आयसीसी मेन्स टी20 संघांच्या क्रमवारीतून तीन संघांना जागा मिळाली. यात आयर्लंड, न्यूझीलंड आणि पाकिस्तान या संघांना जागा मिळाली. अमेरिका पात्रता फेरीतून कॅनडाने जागा मिळवली. युरोप पात्रता फेरीतून इटली आणि नेदरलँडला स्थान मिळालं. अफ्रिका पात्रता फेरीतून नामिबिया, झिम्बाब्वे यांना जागा मिळाली. तर आशिया आणि पूर्व आशिया पॅसिफिक पात्रता फेरीतून नेपाळ, ओमान आणि युएई या संघांची वर्णी लागली.
कशी होईल ही स्पर्धा?
टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी एकूण 4 गट असतील आणि प्रत्येक गटात एकूण पाच संघ असतील. प्रत्येक गटातील टॉप 2 संघ सुपर 8 फेरीत जागा मिळवतील. सुपर 8 फेरीत दोन गट असतील आणि त्यात प्रत्येकी 4 संघ खेळतील. यापैकी टॉप 2 संघांची उपांत्य फेरीत वर्णी लागेल. या स्पर्धेत एकूण 55 सामने होतील. साखळी फेरीत 40 सामने, सुपर 8 फेरीत 12 सामने होतील. तर उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी असे तीन सामने होतील.