
प्रकरणाचे गांभीर्य पाहून आयुक्त गगराणींनी दिले निर्देश !
मुंबई महापालिकेतील बेभरोशे प्रशासकीय कामाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (16 ऑक्टोबर) काही वेळापूर्वी मोठा ब्रेक लावला आहे. महापालिकेने बुधवारी (15 ऑक्टोबर) केलेल्या सर्व 122 बदल्यांना तातडीने स्थगिती दिली आहे.
विशेष म्हणजे महापालिकेत तब्बल 122 दुय्यम इंजिनीअर्सच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. हे कमी म्हणून की काय बुधवारी आणखी 46 असिस्टंट इंजिनीअर्सच्याही बदल्या केल्याची माहिती मिळत आहे. या सर्व बदल्यांना मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली आहे. या शिवाय सहा महिन्यांत केलेल्या काही किरकोळ बदल्यांचीही गंभीर दखल मुख्यमंत्र्यांनी घेतल्याची खात्रीलायक माहिती मिळत असून त्याबाबत कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंबई महापालिकेतील बदल्यांच्या बाजारावर आपलं महानगरने वारंवार आवाज उठवला होता.
मुंबई महापालिकेची तीन वर्षांत निवडणूक झाली नाही. त्यामुळे महापालिकेवर प्रशासक राज आहे. परिणामी महापालिकेच्या कारभारात सावळा गोंधळ सुरू आहे. महापालिकेत बदल्या आणि बढत्यांसाठी लाखोंची बोली लावली जाते अशी बातमी ‘आपलं महानगर’ने 9 जून 2025 रोजी प्रसिद्ध केल्यानंतर महापालिकेचे मुख्यालय आणि वॉर्ड ऑफिसमध्ये खळबळ उडाली होती. त्यानंतर काही दिवस हालचाली मंदावल्या होत्या मात्र, पुन्हा बदल्यांचा आणि बढत्यांचा सिलसिला सुरू झाला होता. वास्तविक 3 वर्षांनी सेवाज्येष्ठता आणि आरक्षणनिहाय बदल्या-बढत्या नियमित केल्या जात होत्या. मात्र,लोकप्रतिनिधी नसल्यामुळे प्रशासनाचे हम करे सो कायदा, असेच वर्तन सुरू आहे. यंदा जानेवारीपासून लक्ष्मीदर्शन, ओळखी, चिठ्ठ्या असा बदल्या-बढत्यांचा ट्रेंड सुरू होता. यावर आपलं महानगरने जोरदार प्रकाशझोत टाकल्यानंतर महापालिका प्रशासन आणि मंत्रालय हादरले होते.
दरम्यान, माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहून मुंबई महापालिकेतील बदल्यांचा बाजार तत्काल थांबवावा, अशी मागणी दोन दिवसांपूर्वी केली होती. याच पत्रात त्यांनी अतिरिक्त आयुक्त डॉ. अमित सैनी यांच्या अखत्यारित 122 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून आणखी 100 बदल्या प्रक्रियेत असल्याचा आरोप केला होता. डॉ. सैनी आजपासून (16 ऑक्टोबर) बिहार विधानसभा निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून गेले आहेत. मात्र, तत्पूर्वी काल (15 ऑक्टोबर) आणखी 46 बदल्या केल्याची माहिती मिळत आहे.
आता खुद्द मुख्यमंत्र्यांनी सर्व बदल्यांना स्थगिती दिली आहे. मात्र, स्थगिती दिल्यानंतर या बदल्यांची चौकशी होणार का, हे अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र, मुख्यमंत्र्यांना यात हस्तक्षेप करावा लागला याचाच अर्थ मुंबई महापालिकेतील बदल्यांचे अर्थपूर्ण प्रकरण हाताबाहेर गेले होते, याची त्यांना खात्री पटली असेल.