
गेल्या काही महिन्यांपासून अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या गरोदरपणाची जोरदार चर्चा आहे. खुद्द सोनाक्षीने यावर अनेकदा प्रतिक्रिया दिली आहे. परंतु तरीही या चर्चा काही थांबण्याचं नाव घेत नाहीयेत.
आता प्रेग्नंसीच्या चर्चांवर अखेर सोनाक्षीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक मजेशीर पोस्ट लिहिली आहे. गरोदरपणावरून सतत कमेंट करणाऱ्यांना आणि चर्चा करणाऱ्यांना तिने सडेतोड आणि तिच्याच अंदाजात उत्तर दिलं आहे. सोनाक्षी सिन्हाने 23 जून 2024 रोजी बॉयफ्रेंड झहीर इक्बालशी लग्न केलं. घरातच मोजक्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत या दोघांनी ‘स्पेशल मॅरेज ॲक्ट’अंतर्गत नोंदणी पद्धतीने लग्न केलं. सोनाक्षी हिंदू आणि झहीर मुस्लीम असल्याने या दोघांना बऱ्याच ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. परंतु या ट्रोलिंगला न जुमानता दोघंही एकमेकांवर मोकळेपणे प्रेमाचा वर्षाव करताना दिसतात.
सोनाक्षी आणि झहीर हे नुकत्याच एका दिवाळी पार्टीत गेले होते. यावेळी पापाराझींसमोर फोटोसाठी पोझ देताना सोनाक्षीने पोट झाकण्याचा प्रयत्न केला होता. त्यावरून नेटकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा तिच्या प्रेग्नंसीच्या चर्चांना उधाण आलं होतं. आता आणखी एका दिवाळी पार्टीचे फोटो पोस्ट करत सोनाक्षीने कॅप्शनमध्ये त्या चर्चांवर उत्तर दिलं आहे. ‘मानवी इतिहासातील सर्वांत जास्त काळ गर्भधारणेचा वर्ल्ड रेकॉर्ड (आमच्या प्रेमळ आणि अति बुद्धिमान मीडियानुसार 16 महिने आणि त्यावर) तेसुद्धा फक्त पोटावर हात ठेवून पोझ दिल्याबद्दल. या चर्चांवर आमची प्रतिक्रिया पहायची असेल तर शेवटच्या स्लाइडपर्यंत स्क्रोल करा.. आणि नंतर या दिवाळीत चमचमत राहा’, असं तिने लिहिलंय.
एका दिवाळी पार्टीत झहीरसुद्धा सोनाक्षीच्या प्रेग्नंसीच्या चर्चांवरून खिल्ली उडवतो. पापाराझींसमोर फोटोसाठी पोझ देताना तो जाणूनबुजून तिच्या पोटावर हात ठेवतो. त्यानंतर सोनाक्षीसुद्धा जोरजोरात हसू लागते. “आम्ही फक्त मस्करी करतोय”, असं तो पापाराझींना स्पष्ट करतो. याआधी जूनमध्येही सोनाक्षीच्या प्रेग्नंसीच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यावेळी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सोनाक्षीने थेट प्रतिक्रिया दिली होती. “तुम्ही काहीही केलं तरी लोकांना जे म्हणायचं असतं, ते म्हणतातच. जर मी म्हटलं की मी पांढरे कपडे घातले आहेत, तर कोणीतरी उठून म्हणेल की नाही, तो काळा रंग आहे. त्यामुळे तुम्ही फक्त आयुष्यात पुढे चालायचं असतं. प्रत्येक छोट्या गोष्टीकडे लक्ष देण्यात काहीच अर्थ नसतो”, असं ती म्हणाली होती.