
बच्चू कडूंचे वादग्रस्त विधान !
बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा येथे झालेल्या राज्यव्यापी शेतकरी हक्क परिषद पार पडली. यावेळी राज्याचे माजी आमदार आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूबाबत खळबळजनक विधान केले आहे.
संभाजी महाराजांना मारण्यासाठी औरंगजेब बदनाम झाला, पण त्यांना त्यांच्याच सासऱ्यांनी मारले, असा दावा बच्चू कडू यांनी केला.
बच्चू कडू काय म्हणाले?
पातुर्डा येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर आणि ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे दीपक केदार यांच्या उपस्थितीत ही परिषद पार पडली. यावेळी बच्चू कडू यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल एक वक्तव्य केले. छत्रपती शिवरायांनी जी वतनदारी बंद केली, त्या वतनदारीविरोधात पहिलं आंदोलन झालं, पहिला संघर्ष तोच झाला. पाटील, कुलकर्णी, देशपांडे, देशमुख… सर्व जातीत ज्या गावात जी जात मोठी असेल, त्याचा वतनदार असायचा. तो २० गावांना लुटायचा. तेव्हा जर ४ क्विंटल कापूस आला, तर त्यातील दोन क्विंटल त्याला द्यावा लागत होता. नाही दिलं तर ते पोरी-बाळी उचलून घेऊन जायचे. हे आमचेच वतनदार होते. त्या वतनदारीतून गुलामशाही, आदिलशाही, निजामशाही चालायची.” असे बच्चू कडू म्हणाले.
नवा वाद निर्माण होण्याची शक्यता
या वतनदारी प्रथेवर बोलताना बच्चू कडू यांनी थेट संभाजी महाराजांचा उल्लेख केला. पहिली वतनदारी बंद केली म्हणून संभाजी राजे सासऱ्यांकडून मारले गेले. नाव औरंगजेबाचं असलं तरी सासरा किती कारणीभूत आहे, हे शोधायला हवं. राजा मरण पत्करायला तयार झाला, पण त्यांनी वतनदारीला साथ दिली नाही, असे बच्चू कडू यांनी सांगितले. बच्चू कडू यांच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या वक्तव्यावर राजकीय आणि ऐतिहासिक वर्तुळातून काय प्रतिक्रिया येतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
फक्त एक टक्का मेहनत आंदोलनात करा
यावेळी आमदार बच्चू कडू यांनी पंजाबमधील शेतकरी आंदोलनाचा संदर्भ देत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर टीका केली. येत्या २८ तारखेला शेतकऱ्यांनी नागपूर येथे एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले. पंजाबच्या शेतकऱ्यांनी १३ महिने आंदोलन करून काळे कायदे रद्द करायला लावले. आणि आम्ही बायकोची आठवण आली की चाललो घरी. तुम्ही शेतात जेवढी मेहनत करता, त्याच्या फक्त एक टक्का मेहनत आंदोलनात करा, तुमचे काम होईल, असे बच्चू कडू म्हणाले.