
नेमकं काय घडलं ?
सध्या दिवाळीच्या निमित्ताने सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही देशातील जवानांसोबत दिवाळी साजरी केली.यावेळेस मोदींनी दिवाळी साजरी करण्यासाठी गोवा आणि कारवारच्या किनाऱ्यावर असलेल्या आयएनएस विक्रांतची निवड केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी जवानांना संबोधित करताना सांगितले की, तुमच्यासोबत दिवाळी साजरी करणे हे माझं मोठे सौभाग्य आहे, असे पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.
माझ्या एका बाजूला समुद्र आहे आणि दुसऱ्या बाजूला माझ्या शूर सैनिकांचे अथांग सामर्थ्य आहे. या समुद्राच्या पाण्यावर चमकणारी सूर्यकिरणे म्हणजे शूर जवानांनी लावलेले दिवाळीचे दिवे आहेत, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांचे कौतुक केले.
जहाज लोखंडाचे असते, पण जेव्हा तुम्ही त्यावर स्वार होता, तेव्हा ते शूर बनते. जवानांची मेहनत आणि साधना ही अत्यंत उच्च स्तरावर आहे, हे मी अनुभवले नसले तरी निश्चितपणे जाणले आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
यंदा माझी दिवाळी खास झाली असे सांगत त्यांनी उपस्थित जवानांना आणि त्यांच्या कुटुंबियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच आयएनएस विक्रांतवरून संपूर्ण देशवासियांनाही दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला कडक शब्दात सुनावलं. आपल्या तिन्ही सेनांमधील समन्वयामुळे आपण पाकिस्तानला विक्रमी वेळेत गुडघे टेकायला लावले. कोणताही धोका किंवा संघर्ष संभवत असताना जो आपल्या ताकदीवर ठाम राहून लढतो, त्यालाच फायदा मिळतो, असे पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी सशस्त्र दलातील शूर जवानांना सलाम केला. तसेच सैन्याला खऱ्या अर्थाने प्रभावी बनवण्यासाठी ते मजबूत, सक्षम आणि आत्मनिर्भर असणे आवश्यक आहे, असेही मोदी म्हणाले.
यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आयएनएस विक्रांतचे महत्त्व यावेळी सांगितले. काही महिन्यांपूर्वीच आम्ही पाहिले आहे की आयएनएस विक्रांतचे नाव ऐकूनच संपूर्ण पाकिस्तानची झोप उडाली होती, असे मोदी म्हणाले.
शत्रूच्या धैर्याचा अंत करणारे आयएनएस विक्रांत हे आज आत्मनिर्भर आणि मेड इन इंडियाचे खूप मोठे प्रतीक आहे. महासागराला भेदून जाणारे हे स्वदेशी विक्रांत भारताच्या सैन्य सामर्थ्याचे प्रतिबिंब आहे, असे पंतप्रधान मोदींनी ठामपणे सांगितले.