आतेभावाच्या आरोपांनी खळबळ…
सातारा जिल्ह्यातील फलटण शहरातील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका महिला डॉक्टरनं अत्याचार आणि शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून एका नामांकित हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (ता.24) सकाळी उघडकीस आली आहे.
या घटनेने सातारा (Satara),बीड जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाली आहे.
बीड येथील मृत डॉक्टर महिलेने आत्महत्येपूर्वी तिच्या तळहातावर सुसाईड नोट लिहिली असून त्यात तिने पोलीस अधिकारी गोपाल बदनेवर बलात्काराचा व घरमालकाचा मुलगा प्रशांत बनकर याच्यावर मानसिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. पोलीस उपनिरीक्षक बदनेने तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचं म्हटलं आहे. फलटण शहरामध्ये विद्यानगर येथे राहत असणाऱ्या घरमालकाचा मुलगा प्रशांत बनकर यानेही तिचा सलग चार महिने मानसिक छळ केला होता.
डॉक्टर महिलेनं ऐन भाऊबीजेदिवशी आत्महत्या करत आपलं जीवन संपवल्यानं फलटण तालुक्यासह बीड जिल्ह्यातही एकच खळबळ उडाली आहे.या घटनेनंतर पोलीस प्रशासनही हादरलं आहे. तसेच नागरिकांमध्येही या घटनेनं संतापाची तीव्र लाट उसळली आहे. दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी कुटुंबियांवर केली जात आहे.
पीएम अहवाल बदलण्यासाठी दबाव
याबाबत डॉक्टर महिलेच्या भावानं गंभीर आरोप केले आहेत ,ज्यानं एकच खळबळ उडाली आहे. बहीण दोन वर्षांपासून कार्यरत आहे.एक वर्षापासून शवविच्छेदन अहवाल बदलण्यासाठी,चुकीचा देण्यासाठी तिच्यावर राजकीय व पोलिसांचा दबाव येत होता.याबाबत तिने तिच्या डॉक्टर असलेल्या बहिणीला सांगितले होते.
परंतु एवढा गंभीर त्रास असेल असे वाटले नव्हते.या त्रासाबाबत तिने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रारही केली होती; परंतु त्यावर कारवाई झाली नाही.माहिती अधिकारात तिने माहिती मागूनही दिली गेलेली नाही.तिने हातावर संशयितांची नावे लिहिली असल्याचं नमूद केलं आहे.
संशयित आरोपी विरुद्ध फलटण शहर पोलीस ठाण्यात बलात्काराचा व आत्महत्तेस प्रवृत्त केल्याबाबत गुन्हा नों.क्र.३४५/२०२५ कलम ६४(२)(एन),१०८ भा.न्या. संहितेप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.याबाबत सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी म्हणाले,फलटण येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणी पोलिसासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संबंधित पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे.संशयित आरोपींच्या अटकेसाठी तपास पथके रवाना करण्यात आले आहेत.
पीडित महिला डॉक्टर दिवाळीत सुट्ट्या नसल्यानं पुढच्या आठवड्यात घरी जाणार होती अशी माहिती समोर आली आहे. पण त्या आधीच तिने टोकाचं पाऊल उचललं. गावाकडे शिक्षणाची सोय नव्हती, त्यामुळे तिचे सर्व शिक्षण तिच्या चुलतीने बीडला केले. एमबीबीएससाठी प्रवेश मिळाल्यानंतर जळगावला तिने वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले.


