मुख्यमंत्र्यांकडून क्लिनचिट पण धनंजय मुंडेंचा रोख कायम; माजी खासदार निंबाळकरांवर निशाणा…
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणाला आता वेगळी राजकीय दिशा मिळाली आहे. या प्रकरणात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे क्लिनचिट देत त्यांच्यामागे खंबीरपणे उभे असल्याचे सातारकरांना दाखवून दिले.
तर दुसरीकडे, मृत डॉक्टरच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी निंबाळकरांवर गंभीर आरोप करत, त्यांच्यासह त्यांच्या स्वीय सहाय्यकांची विशेष पोलीस पथकाकडून चौकशी करण्याची मागणी केली आहे.
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने मानसिक छळ आणि शारीरिक अत्याचाराला कंटाळून आत्महत्या केली. या प्रकरणातील मुख्य आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, मृत डॉक्टरने लिहिलेल्या पत्रात माजी खासदार आणि त्यांच्या स्वीय सहाय्यकावर गंभीर आरोप केले आहेत. आरोपी रुग्णांचे तंदुरुस्ती अहवाल बदलण्यासाठी खासदारांच्या स्वीय सहाय्यकांकडून वारंवार फोन यायचे, असे डॉक्टरने पत्रात नमूद केले होते. याच पार्श्वभूमीवर, धनंजय मुंडे यांनी साताऱ्याच्या माजी खासदारांचे नाव न घेता, त्यांच्याकडून ऊस कामगार आणि मुकादम यांची होणारी पिळवणूक, तसेच महिला डॉक्टरवर टाकण्यात आलेला दबाव या मुद्द्यांकडे लक्ष वेधले.
गरकळ नावाचे मुकादम आहेत, ज्यांचे ट्रॅक्टर माजी खासदारांच्या कारखान्यावर आहेत. त्यांची काही बाकी शिल्लक होती. यावरून काहीसा वाद झाल्याने गरकळ यांना मारहाण करण्यात आली. त्यांना रुग्णालयात नेले. मात्र, त्यांना काहीही झाले नाही, ते पूर्णपणे तंदुरुस्त आहेत, यासाठी मृत महिला डॉक्टरवर दबाव टाकला. माजी खासदारांच्या स्वीय सहाय्यकाने महिला डॉक्टरला अनेक वेळा फोन केले, असे सांगत संबंधित गरकळ नावाच्या मुकादमांना धनंजय मुंडे यांनी माध्यमांसमोर आणले. ऊसतोड मुकादमाला समोर आणून मुंडेंनी सातारा जिल्ह्यात असलेल्या कारखान्याकडून होणारी पिळवणूक समोर आणली.
दरम्यान, ज्या खासदाराचा साखर कारखाना आहे, त्यांच्या स्वीय सहाय्यकाने डॉक्टरवर दबाव टाकला. आता मी शासनाला स्वस्थ बसू देणार नाही, मी मृत डॉक्टरला न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
