भाजप कार्यालयाच्या जागेवरून फडणवीसांचा विरोधकांना टोला !
भाजप कधीच काचेच्या घरात राहत नाही, प्रदेश कार्यालयासाठी जी जागा घेतली ती स्वतःच्या खर्चाने घेतली आणि त्यासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या घेण्यात आल्या आहेत. ज्या लोकांना जागा बळकावण्याची सवय आहे त्यांनी आम्हाला प्रश्न विचारू नये असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत आणि विरोधकांना लगावला.
भाजप कार्यालय हे कार्यकर्त्यांचे घर असेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मुंबईतील चर्चगेट परिसरात भाजपच्या नव्या कार्यालयाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह(Amit Shah) यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडलं. त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना टोला लगावला.
महाराष्ट्र भाजप प्रदेश मुख्यालयाचं आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या हस्ते भूमिपूजन होतंय. मात्र त्याआधी विरोधकांनी या कार्यालयाच्या भूखंडावरून आरोपांच्या तोफा डागायला सुरूवात केलीय. महाराष्ट्र हौसिंग फायनान्स कॉर्पोरेशनची लीजवरची जागा धोकादायक इमारत दाखवत ताब्यात घेण्यात आली आणि त्यावर आता भाजपचे कार्यालय बांधण्यात येत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला. तर खासदार संजय राऊतांनी या भूखंडाच्या फाईलीचा प्रवास राफेलच्या वेगाने झाला अशी टीका करत अमित शाहांना पत्र लिहिलं.
संजय राऊत आणि रोहित पवार यांच्या आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं. आम्ही काचेच्या घरात राहत नाही, स्वतःच्या पैशातून ही जागा विकत घेतल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
प्रत्येक जिल्ह्यात भाजपचं कार्यालय असावं
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “ज्या वेळी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात जेव्हा सरकार आलं तेव्हा भाजपची धुरा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अमित शाह यांनी घेतली. तेव्हा निर्णय घेण्यात आला की प्रत्येक जिल्ह्यात पक्षाचं कार्यालय असावं. त्यावेळी शाहांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी जागा घेतल्या खरेदी करण्यात आल्या. त्याठिकाणी भाजपचं कार्यालय बनवायला सुरुवात झाली. प्रमोदजी होते तेव्हा दादर मधील कार्यालय भव्य होतं. पण प्रदेशचं कार्यालय लहान होतं. अनेक अडचणी असताना देखील त्यातून भाजपचे काम चालायचं. 2014 च्या निवडणुकीत 15 दिवस अमित भाई या कार्यालयात बसून संचालन करायचे. मुंबईचा आवडीचा वडापाव खायचे.
भाजप काचेच्या घरात राहत नाही
विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “आम्ही एक निर्णय घेतला होता, सरकारी जागेच्या मागे न जाता खासगी जागा घ्यावी. मनोज कोटक यांनी ही जागा शोधून काढली. काही लोकांनी त्यावर प्रश्न उपस्थित केला. त्यांना सांगतो भाजप काचेच्या घरात राहत नाही. असं होणार हे मला माहिती होतं. मी मनोजला सांगितलं की आपण जागा खरेदी करू. सगळ्या परवानगी घेऊन जे जे कराव लागतं ते सर्व करून, स्वतःचे पैसे खर्च करून स्वतःची जागा खरेदी केली आहे.
छान डिझाईन तयार झालं असून पुढच्या दोन ते अडीच वर्षात कार्यालय पूर्ण व्हावं असा प्रयत्न असणार आहे. आवश्यकतेपेक्षा जास्त पार्किंग आम्ही घेतलेलं आहे. आमच्याकडे जास्त एफएसआय असताना देखील आवश्यक तेवढाच घेतला आहे. हे कार्यालय स्वप्नातलं कार्यालय आहे. बांधकाम करताना आम्ही कोणाला सोडणार नाही, तुम्हाला सर्वांनाच बांधकाम निधी द्यायचा आहे असंही फडणवीस म्हणाले.


