सरकारला अल्टिमेटम !
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला आहे. हा मोर्चा १२ तासांहून अधिक साधारण १३० किलोमीटरचा प्रवास करून रात्री उशिरा वर्धा जिल्ह्यातील सुकळी बाई गावात पोहोचला.
प्रचंड उत्साह आणि शेतकऱ्यांच्या पाठिंब्याच्या जोरावर हा मोर्चा आज नागपूरकडे कूच करणार आहे. यावेळी नागपुरात महाएल्गार सभा घेऊन बच्चू कडू सरकारला जाब विचारणार आहेत.
बैठक जर वांझोटी झाली, तर काही फायदा नाही
याच पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी स्पष्ट केले की, काल १५० किलोमीटरचा प्रवास केला असून, शेतकरी जात-पात बाजूला ठेवून मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी व्हॉट्सअॅपवर चर्चा केली असून, मागण्या कळवल्या आहेत. मी काल मुख्यमंत्र्यांना मेसेज केला आणि सांगितले की मी बैठकीला येणार नाही. मी तिकडे गेलो, तर इकडे दीड लाख शेतकरी एकटे पडतील. इकडे काही झालं तर कोण जबाबदार? बैठक जर वांझोटी झाली, तर काही फायदा नाही. सरकारने त्यांचा प्रतिनिधी पाठवावा.
आम्ही चार ते पाच वाजेपर्यंत शांततेत ही लढाई आम्ही लढत आहोत. ४-५ वाजेपर्यंत आम्ही वाट पाहतो, नंतर आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रामगिरी बंगल्यावर जाणार आहोत, असा अल्टिमेटम बच्चू कडू यांनी सरकारला दिला.
मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालावं
आम्हाला निर्णय लेखी स्वरूपात, परिपत्रकाच्या स्वरूपात सरकारने काढावे लागतील. सरकारने शक्तीपीठ महामार्ग तत्काळ रद्द करावा. पॅकेज फक्त ६ हजार कोटींचे आहे. सरकार आकडे फुगवून सांगत आहे. केवळ चर्चा करायची हे योग्य नाही. निर्णय घ्या. हमीभाव राज्य सरकार देत नाही. हमी भावाने माल खरेदी केला जात नाही. मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालावं, अशा विविध मागण्या बच्चू कडू यांनी केल्या.
तुमच्या धोरणामुळे मेल्यापेक्षा रस्त्यावर येऊन मेलेल बरं. रायगड उपोषण केले, पण चार महिन्यांपासून निर्णय घेतला नाही. ट्रॅक्टर मोर्चाला परवानगीची गरज काय? नवरदेव घोड्यावर निघतो, तर परवानगी काढतो का? आम्हाला अजूनही मोर्चाची परवानगी दिली नाहीये. पोलिसांच्या हातात आता भाजपचा झेंडा द्यावा लागेल, असा टोला बच्चू कडू यांनी लगावला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गनिमी काव्याने आम्ही पुढं जाऊ. सातबारा कोरा करा, नाहीतर आमच्या छातीवर गोळ्या झाडा, अशा इशाराही बच्चू कडू यांनी दिला.
आपले शेतकरी हटणार नाहीत
दरम्यान रात्री साडेबारा वाजता वर्धा जिल्ह्यातील सुकळी बाई गावात पोहोचल्यावर बच्चू कडू आणि कार्यकर्त्यांनी बेसन भाकरीचे जेवण केले. हनुमानजीच्या मंदिरात बच्चू कडू यांच्यासह हजारो शेतकऱ्यांनी जमिनीवर गाद्या टाकून विश्रांती घेतली. आज सकाळी शेकडो ट्रॅक्टरसह हजारो शेतकरी नागपूरकडे कूच केली आहे. या महा एल्गार सभेला राज्यभरातील हजारो शेतकरी आणि शेतकरी नेते हजर राहणार आहेत. ऊन, वारा, पाऊस असला तरी आपले शेतकरी हटणार नाहीत, असा निर्धार बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे.


