युनायटेड किंगडमचे पंतप्रधान कीर स्टार्मर अलीकडेच मोठ्या टीमसह भारत दौऱ्यावर आलेले. त्यावेळी दोन्ही देशांमध्ये 3800 कोटी पेक्षा जास्तचे करार झाले. 9 ऑक्टोंबरला हे करार झाले. त्यानंतर बरोबर 18 दिवसांनी म्हणजे 27 ऑक्टोंबर रोजी स्टार्मर यांनी तुर्कीसोबत एक खास करार केला आहे.
त्याअंतर्गत तुर्कीला ब्रिटनकडून 20 नवीन युरोफायटर टायफून फायटर जेट्स मिळतील. ही डील 10.7 अब्ज डॉलर्सची आहे. या डीलमुळे नाटो देशातील संबंध अधिक दृढ होतील व तुर्कीची हवाई सुरक्षा अजून मजबूत होईल. कीर स्टार्मर यांच्या तुर्की दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांमध्ये हा महत्वाचा करार झाला. पीएम म्हणून स्टामर्र यांचा हा पहिला तुर्की दौरा होता. राष्ट्रपीत एर्दोगान यांची भेट घेतली व करारावर स्वाक्षरी केली.
काही विश्लेषकांनी ही डील महागडी असल्याचं म्हटलं आहे. भविष्यात इस्रायल सारख्या प्रतिस्पर्ध्याचा सामना करावा लागेल म्हणून तुर्की अत्याधुनिक लढाऊ विमानं विकत घेत आहे. 20 फायटर जेट्सपैकी पैकी तुर्कीला पहिलं टायफून 2030 साली मिळेल. 2023 मध्ये या करारासाठी बोलणी सुरु झाली होती असलं स्टार्मर यांनी सांगितलं. इस्तांबुल येथील संरक्षण तज्ज्ञ बुराक यिल्दिरिम यांनी या डीलला महागडं ठरवलं आहे. ते फ्रिगेटच्या किंमतीला विमानं विकत आहेत, असं यिल्दिरिम म्हणाले. हा करार म्हणजे सरळसरळ फसवणूक आहे. ते एक विमान विकताना चारची किंमत वसूल करतायत असं यिल्दिरिम यांचं म्हणणं आहे.
भारताची रणनिती काय?
मागच्या काही वर्षात भारताचे तुर्कीसोबत संबंध बिघडले आहेत. ऑपरेशन सिंदूरवेळी तुर्कीने जाहीरपणे पाकिस्तानला साथ दिली होती. रिपोर्ट्समध्ये असं सुद्धा म्हटलेलं की, तुर्कीने पाकिस्तानच्या मदतीसाठी आपली युद्धनौका कराची बंदरात पाठवली आहे. त्यानंतर भारतीय नौदल तुर्की विरोधात आक्रमक अभियान चालवत आहे. अलीकडेच भारतीय नौदलाने तुर्कीच्या शेजारी देशांसोबत मिळून युद्धसराव केला. ग्रीस, सायप्रस आणि आर्मेनिया या देशांसोबत तुर्कीचे वाद चालू आहेत. त्या देशांसोबत भारत आपले मैत्री संबंध अजून घट्ट बनवत आहेत. तुर्कीच्या विरोधकासोबत दृढ मैत्री ही भारताची सध्याची रणनिती आहे.
आंतरराष्ट्रीय कुटनितीमध्ये कोणी कोणाचा नसतो
आंतरराष्ट्रीय कुटनितीमध्ये कोणी कोणाचा नसतो. स्वार्थासाठी संबंध असतात. यूके सुद्धा तेच करतोय. ते एकाबाजूला भारतासोबत डील करतायत आणि दुसऱ्याबाजूला भारताच्या शत्रूसोबत हातमिळवणी. स्टार्मर भारतात 100 पेक्षा जास्त लोकांची टीम घेऊन आले होते. त्यांच्या या दौऱ्यात 3884 कोटीची डील झाली. या करारातंर्गत ब्रिटन भारतीय सैन्याला हल्के बहुउद्देशीय मिसाइल्स देणार आहे.


