एकनाथ शिंदेंच्या घराबाहेरील तो बॅनर चर्चेत; मनसेने डिवचले !
राज्यातील विरोधी पक्षांनी विशेषतः महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकत्र मोर्चाची हाक दिली आहे. येत्या १ नोव्हेंबर रोजी मुंबईत निवडणूक आयोगाच्या विरोधात सत्याचा विराट मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.
मतदार यादीतील कथित घोटाळे आणि मतचोरीच्या विरोधात संविधान आणि लोकशाही वाचवण्याचा मुख्य नारा या मोर्चातून दिला जाणार आहे. आता याप्रकरणी मनसेकडून जोरदार तयारी आणि बॅनरबाजी करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाच्या जवळच ठाकरे गट आणि मनसेने केलेल्या जोरदार बॅनरबाजीमुळे ठाण्याचे राजकारण ढवळून निघाले आहे.
महाविकासआघाडी आणि मनसेने आयोजित केलेला हा विराट मोर्चा मुंबईतील मरीन लाइन्स परिसरातून निघणार आहे. या मोर्चाचा प्रमुख उद्देश मतचोरी आणि मतदार यादीत झालेले मोठे घोळ निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून देणे आहे. या मोर्चातून थेट केंद्रीय निवडणूक आयोगाला जाब विचारला जाणार आहे. “संविधान वाचवा, लोकशाही जगवा आणि मतचोरी विरोधात सत्याचा मोर्चा अशा प्रमुख घोषणा आहेत. मतदार यादीतील त्रुटी आणि गैरप्रकार तातडीने दूर करून खऱ्या मतदारांना न्याय मिळवून देण्याची मागणी विरोधक करणार आहेत.
त्यातच आता मनसे नेते अविनाश जाधव यांनी लावलेला एक बॅनर विशेष चर्चेचा विषय ठरला आहे. ठाण्यातील तलावपाळी परिसरात लावलेल्या या बॅनरवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे एकत्र फोटो झळकले आहेत. ज्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. ‘सत्तेसाठी खोटी मतदार यादी… तिच्या विरोधात विराट मोर्चात खऱ्या मतदारांनी सामील व्हा,’ असे आवाहन या बॅनरद्वारे करण्यात आले आहे.
खऱ्या मतदारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे
या बॅनरवर सत्तेची नाही, सत्याची लढाई असा आशय पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, हे बॅनर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानाच्या अगदी जवळ लावण्यात आले आहेत. या बॅनरवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा नेते आदित्य ठाकरे यांचे फोटो झळकत आहेत. याशिवाय ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे आणि शिवसेना नेते राजन विचारे यांचेही फोटो आहेत. या मोर्चात कार्यकर्त्यांनी आणि खऱ्या मतदारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन या बॅनरमधून करण्यात आले आहे.
तर दुसरीकडे मनसेने देखील चलो मुंबईचा नारा दिला आहे. येत्या १ नोव्हेंबरला मरीन लाइन्सहून निघणाऱ्या मतचोरी विरोधात सत्याचा मोर्चा साठी मनसेच्या बॅनरवर संविधान वाचवा, लोकशाही जगवा, चलो मुंबई! असे ठळक घोषवाक्य देण्यात आले आहे. या बॅनरवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे, अमित ठाकरे आणि ठाण्याचे नेते अविनाश जाधव यांचे फोटो आहेत.
जोरदार बॅनरबाजी
ठाण्यामध्ये शिंदे यांच्या निवासस्थानाजवळ ठाकरे गट आणि मनसेकडून करण्यात आलेली जोरदार बॅनरबाजी हे याच मोर्चाच्या पार्श्वभूमीवरचे शक्तिप्रदर्शन मानले जात आहे. येत्या १ नोव्हेंबरच्या मोर्चाच्या निमित्ताने राज्यात एक अनोखे राजकीय चित्र पाहायला मिळत आहे. शिवेसना ठाकरे गट ,राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस या महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांसोबतच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पक्षही या मोर्चात सहभागी होणार आहे.


