राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष मोहोळचे माजी आ. राजन पाटील (अनगरकर), माजी आ. यशवंत माने, जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे, विक्रांत पाटील, अजिंक्यराणा पाटील, नागनाथ क्षीरसागर यांच्यासह अनेक राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्त्यांनी बुधवारी मुंबईतील प्रदेश कार्यालयात भाजपमध्ये प्रवेश केला.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांनी सर्वांना पक्षात प्रवेश दिला. यावेळी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, चेतनसिंह केदार, माजी आ. राम सातपुते यांची उपस्थिती होती. बुधवारी दुपारी अनगरकर आणि माढ्याचे शिंदे हजारो समर्थकांसह मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयात पोहचले. प्रथम मोहोळचे प्रवेश घेण्यात आले. त्यानंतर माढ्यातील शिंदे गटाचे प्रवेश पार पडले. या प्रवेशानंतर मोहोळ आणि माढ्यात दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
मोहोळ आणि माढा या दोन्ही तालुक्यात भाजपाला म्हणावे तसे यश आतापर्यंत मिळवता आलेले नाही. पाटील आणि शिंदेंच्या माध्यमातून पहिल्यांदाच भाजप दोन्ही तालुक्यात बळकट झाली आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषद निवडणूकीत याचा परिणाम होण्याची चिन्हे आहेत. पाटील आणि शिंदेंच्या भाजप प्रवेशामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला असलेला जिल्हा हादरला असून, आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांपूर्वी राजकीय समीकरणात मोठा बदल होण्याची चिन्हे आहेत.
यांचा झाला प्रवेश
माजी आ. राजन पाटील त्यांची दोन्ही मुले माजी जिल्हा परिषद सदस्य विक्रांत पाटील व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, माजी आ. यशवंत माने, जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे, माढ्याचे माजी सभापती विक्रमसिंह शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी कांबळे, जिल्हा दूध संघाचे व्हाईस चेअरमन दीपक माळी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन धनाजी गावडे, मोहोळ राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र चवरे, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष अस्लम चौधरी, डीसीसी बँकेचे माजी संचालक भारत सुतकर, शिंदे सेनेचे नेते नागनाथ क्षीरसागर, सोमेश क्षीरसागर यांच्यासह मोहोळ व माढा तालुक्यातील राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.


