वकील सातपुतेंचा दावा; कोर्टातही जाणार !
गुरुवारी मुंबई उपनगरातील पवई भागात खळबळ उडाली ती एका थरारमय नाट्यामुळे. ऑडिशन्सच्या नावाखाली रोहित आर्या नामक व्यक्तीने 17 लहान मुले, एक ज्येष्ठ महिला आणि एका नागरिकाला अशा एकूण 19 लोकांना बंधक बनवून ठेवले.
एल अँड टी गेट क्रमांक 5 समोर असलेल्या RA स्टुडिओमध्ये हा थरार घडला. यावेळी बंधकांना रोहित आर्याच्या तावडीतून सोडण्यासाठी पोलिसांनी शक्कल लढवली. त्याची पोलिसांनी समजूत काढण्याचा सुद्धा प्रयत्न केला. पण ओलिस ठेवलेल्यांच्या बचावासाठी आलेल्या पोलिसांवर रोहित आर्या यांनी एअर गन रोखली. ज्यानंतर पोलिसांनी बचावासाठी त्यांच्यावर गोळी चालवली आणि या घटनेच्या काही तासांनी उपचारादरम्यान रोहित आर्या यांचा मृत्यू झाला. पण रोहित आर्या यांचा हा एन्काऊंटर नसून मर्डर असल्याचा दावा वकील नितीन सातपुते यांनी केला आहे.
रोहित आर्या यांचा एन्काऊंटर टाळणे शक्य होते, त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी आता होऊ लागली आहे. त्यामुळे या प्रकरणावरून नवा वाद निर्माण होत असतानाच वकील नितीन सातपुते हे स्वतः हे प्रकरण कोर्टात घेऊन जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. याचबाबत सातपुते यांनी आपलं महानगरशी संवाद साधताना म्हटले आहे की, आता हे प्रकरण वरवर ज्याप्रमाणे दिसत आहे, त्याप्रमाणे ते नाही. खरं तर हे रोहित आर्या जे आहेत, त्यांचा एन्काऊंटर टाळता आला असता. ते मागील एक-दोन महिन्यापासून उपोषणाला बसले होते. त्यांच्यासोबत त्यांचे पत्नी सुद्धा उपोषण करत होती. सरकारला रोहित आर्या यांना दोन करोड रुपयांचे देणे होते. त्यांनी शाळांसाठी एक स्वच्छता प्रकल्प राबवला होता, तो सरकारमार्फत राबवला होता. त्याचेच हे पैसे होते. त्यामुळे ते पैसे मिळावे, याबाबत आर्या यांच्याकडून विनंती करण्यात येत होती, अशी माहिती सातपुते यांनी दिली.
तसेच, दोन करोड ही फार मोठी रक्कम आहे. पण हे पैसे आले नाही आणि त्यामुळे रोहित आर्या यांनी आत्महत्या करण्याचा सुद्धा प्रयत्न केला. पुण्यामध्ये त्यांनी जेव्हा उपोषण केले, तेव्हा त्यांना झटका आला होता. ते बेशुद्ध पडले होते. पैसे आले नाही, म्हणून आर्या यांनी टोकाचे पाऊल उचलले होते. पण हे पाऊल त्यांनी थेटपणे उचलले नाही. तर त्याआधी त्यांनी सरकारला सांगितले. माजी मंत्री केसरकर त्यांच्या संपर्कात होते. त्यांच्या बिलचे आणि एक स्टेटमेंट आहे, ज्यामध्ये लिहिले आहे की, आर्या यांना दोन करोड रुपये देणे आहे. त्याशिवाय, 99 लाख सुद्धा देणे आहे. हेच पैसे देण्याची वारंवार विनंती सुद्धा करण्यात आली. त्यामुळे हे पैसे घेण्यासाठीच त्यांनी ब्लॅकमेल करण्याचा निर्णय घेतला, असे सातपुतेंनी सांगितले.
आपल्या सर्वांना माहिती आहे की, अभिनेत्री यामी गौतमी यांचा ‘A Thursday’ नावाचा चित्रपट आला होता. त्यामुळे आर्या यांनी सुद्धा याच पद्धतीने एक बनाव रचला, कारण त्यांना वाटले की, त्यांचे पैसे मिळतील. कारण गेल्या कित्येक वर्षांपासून ते त्यांचे पैसे मिळावे या प्रयत्नात होते. त्यामुळे रोहित आर्या यांनी जे काही मुलांना ओलीस ठेवले त्याचे समर्थन करत नाही, पण पोलिसांनी त्यांच्या पायावर गोळी मारण्याऐवजी छातीत गोळी मारली हे अत्यंत चुकीचे होते. कारण, जशी माहिती समोर येत आहे की, रोहित आर्या यांच्याकडे छऱ्याची बंदूक होती.
त्यामुळे त्याने केवळ ईजा झाली असती, पण त्या बंदूकीने कोणाचा जीव गेला नसता. पण रोहित आर्या हे आता व्यवस्थेचा बळी ठरल आहेत, त्यांचा एन्काऊंटर नाही तर मर्डर झाला आहे. त्याचमुळे या प्रकरणी आता मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. तसेच, गरज लागली तर आम्ही सर्वोच्च न्यायालयात सुद्धा जाऊ. पण रोहित आर्या यांना न्याय मिळवून देऊ, असे वकील नितीन सातपुते यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.


