राज ठाकरेंनी केला धमाका; EVM मधून मतचोरीचा दिला डेमो…
निवडणुकांमध्ये वापरल्या जाणाऱ्या ईलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्स अर्थात ईव्हीएमद्वारे देखील मतचोरी केली जाते, असा आरोप करतानाच त्याचा थेट लाईव्ह डेमोच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईत दाखवला.
ईव्हीएम मशिन कशा प्रकारे मतचोरीसाठी प्रोग्राम केल्या जातात तसंच व्हीव्हीपॅट मशिनमध्ये बसवलेल्या काळ्या काचा आणि सेन्सर्सच्या मदतीनं ही मतचोरी केली जात असल्याचं त्यांनी समप्रमाण दाखवून दिलं आहे. यासाठी त्यांनी डमी मशिन्स वापरलेले असले तरी या टेक्निकल गोष्टींसाठी वर्तमानपत्रांमधील बातम्या आणि खऱ्या मतदान केंद्रावरील फुटेजही दाखवण्यात आलं. याद्वारे राज ठाकरेंनी केवळ आरोप न करता डेमो देत मोठा धमाका केला आहे.
मतचोरीचा लाईव्ह डेमो
मुंबईतल्या रंगशारदा सभागृहात राज ठाकरेंनी आज सभा घेतली. या सभेमध्ये त्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना तर संबोधित केलंच पण त्याचबरोबर पुन्हा एकदा लाव रे तो व्हिडिओ प्रमाणं EVM मशिन्समधून कशा प्रकारे मतचोरी केली जाते, याचा लाईव्ह डेमो दिला. राहुल चिमणभाई मेहता या दिल्ली आयआयटीमधून सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग आणि अमेरिकेतून कॉम्प्युटर सायन्सचं शिक्षण घेतलेल्या एका इंजिनिअरनं तयार केलेल्या EVM Black glass and EVM light Sensor Vote Theft मशिन्स या डेमोमध्ये वापरण्यात आल्या. अमित उपाध्याय यांनी ‘ईव्हीएम हटाव सेना’ द्वारे तयार केलेल्या डेमो EVM मशिनमधून मतचोरीचं प्रात्यक्षक दाखवलं.
धक्कादायक निकाल
डेमोमध्ये धक्कादायक निकाल समोर आलेले पाहायला मिळाले. यामध्ये केळी, कलिंगड आणि सफरचंद अशा नावाची तीन उमेदवार दाखवण्यात आले. तसंच आपण नेहमी ज्या प्रकारे EVMवर मतदान करतो त्याच प्रकारे मतदान प्रक्रिया राबवली. पण तरीही केळ्याला मतदान केल्यानंतर ते सफरचंदाला जात असल्याचं यातील VVPAT मशिनमधून दिसून आलं. विशेष म्हणजे मतदान एकाला केलं आणि मत भलत्यालाच गेलेलं व्हीव्हीपॅटमधील पावती बघूनही मतदाराला कळत नाही, अशा प्रकारे हे ईव्हीएम प्रोग्राम केलेले होते.
काळी काच आणि सेन्सर्सची कमाल
यामध्ये मतचोरीचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे VVPAT हा आहे, कारण यामध्ये बसवलेल्या विशिष्ट प्रकारच्या काळ्या काचेमुळं, पावती दाखवणाऱ्या लाईटचा कालावधी तसंच VVPAT मशिनला बसवलेल्या सेन्सरमुळं ही संपूर्ण मतचोरी होत असल्याचं दिसून आलं. खरंतर मतचोरी ही ईव्हीएम मशिनमध्येच प्रोग्राम केलेली असते पण VVPAT मशीनद्वारे दिशाभूल होत असल्यानं ही मतचोरी मतदाराला कळूच शकत नाही, याचं लाईव्ह प्रात्यक्षिक यावेळी मनसेच्यावतीनं दाखवण्यात आलं. त्याचबरोबर केवळ दोन प्रकारच्या प्रोग्राममधून यामध्ये मतचोरी दाखवण्यात आली असली तरी इतरही अनेक मार्गांनी मतचोरी केली जात असल्याचा दावा यावेळी हे प्रात्यक्षिक सादर करणाऱ्या अमित उपाध्याय यांनी सांगितलं.


