महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल ?
सातारा जिल्ह्यातील फलटण शहरात घडलेल्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या घटनेनंतर पीडित महिलेला न्याय मिळावा अशी मागणी होत असतानाच दुसरीकडे राज्यात ‘सिस्टीम’ विरोधात संतापाची तीव्र लाट उसळलेली दिसून येत आहे.
याचदरम्यान, फलटण प्रकरणाचा धागा जोडत एक नवी आणि खळबळजनक मागणी समोर आली आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (सचिन खरात गट ) राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी शुक्रवारी (ता.31) पीडित कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी सरकारने या प्रकरणात कठोर कारवाई करावी अशी मागणी केली.तसेच त्यांनी यावेळी पंकजा मुंडेंना गृहमंत्री पद देणे आणि सुषमा अंधारे यांची महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून नियुक्ती करणे, अशा दोन मोठ्या मागण्या केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.
फलटण महिला आत्महत्येप्रकरणातील आरोप-प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. आता या प्रकरणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (सचिन खरात गट पक्ष) राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतल्यानंतर आपली आक्रमक भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी यावेळी राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याचा मुद्दा उपस्थित केला.
तसेच राज्यात महिलांविषयीचे प्रश्न सोडविण्यासाठी महिला म्हणून पंकजा मुंडेंना पूर्णवेळ गृहमंत्री पद द्यावं तसेच डॉक्टर आत्महत्या प्रकरण उचलून धरलेल्या सुषमा अंधारेंना महिला आयोगाचं अध्यक्षपद द्यावं, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.या मागणीनंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.
सचिन खरात म्हणाले, महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण साताऱ्यात घडलं असलं, तरी या प्रकरणातील गुन्हा बीड जिल्ह्यात चालवावा. यातील ज्या संशयितांचे नाव येत आहे, त्यांची नार्कोटेस्ट केली जावी, असंही त्यांनी म्हटलं आहे. गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप हे मोठमोठ्या गप्पा मारतात, पण या प्रकरणात मोर्चा का काढत नाहीत? असा संतप्त सवालही सत्ताधारी पक्षाला विचारला.
फलटण शहरातील एका नामांकित हॉटेलमध्ये महिला डॉक्टरने केलेल्या आत्महत्येबाबत काही धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने भाऊबीजेच्या दिवशी आत्महत्या केली असून,तिने हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पीएसआय गोपाळ बदने व घरमालक प्रशांत बनकर यांच्यावर आरोप केले आहेत.
या सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी प्रशांत बनकर याला अटक केली आहे. यानंतर पीएसआय गोपाल बदने स्वत:हून फलटण शहर पोलिस ठाण्यात हजर झाला होता. याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी फलटण महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणात सलग पत्रकार परिषदा घेत काही धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यांनी राज्य महिला आयोग,पोलिस तपास, प्रशासन यांच्यासह राजकीय नेत्यांबाबतही गंभीर विधानं केली आहेत.


