अभिनंदनासाठी उद्धव ठाकरेंचा शिलेदारांना फोन…
स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीच्याआधीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने श्रीकांत शिंदेंच्या बालेकिल्ल्यात मोठा विजय मिळवला. आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीच्या पूर्वीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला गुड न्यूज मिळाली आहे.
एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आणि त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या कल्याण ग्रामीणमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेने विजय मिळवला आहे.
कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील खोणी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ज्योती विश्वास जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः फोन करून ज्योती जाधव यांचे अभिनंदन केले. जाधव यांच्या विजयात मनसेची देखील छुपी साथ लाभली.
ठाकरेंचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली जाधव यांच्या सत्काराचा कार्यक्रम पार पडला. उद्धव ठाकरे यांनी फोन करत ‘हा विजय जनतेच्या विश्वासाचा आणि कार्यकर्त्यांच्या संघटित प्रयत्नांचा आहे.’ असे सांगत पक्ष सदैव विकासासाठी कटिबद्ध राहील, असा निर्धार व्यक्त केला.
मनसेने दिली साथ
ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध निवड होण्यासाठी मनसे नेते आणि माजी आमदार राजू पाटील तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य रमेशदादा पाटील यांनी पडद्यामागून महत्त्वाची भूमिका बजावली असल्याची माहिती जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी दिली.
शिंदेंच्या शिवसेनेकडून प्रत्युत्तर
या विजयानंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून वेगळी प्रतिक्रिया समोर आली आहे. “खोणी ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडणुकीत श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्यानेच निर्णय झाला. उद्धव ठाकरे यांचे नाव वापरून काहीजण अपप्रचार करत आहेत,असे शिंदेंच्या शिवसेनेचे तालुका प्रमुख महेश पाटील यांनी दिली.


