महाराजांनीच दिलं उत्तर…
प्रसिद्ध किर्तनकार आणि समाज प्रभोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या मुलीचा नुकताच साखरपुडा झाला आहे. या कार्यक्रमावर प्रचंड खर्च करण्यात आला, यावरून आता इंदुरीकर महाराज यांच्यावर टीका होत आहे.
इंदुरीकर महाराज आपल्या प्रत्येक किर्तनात सांगतात लग्न साध्या पद्धतीने करा आणि मग त्यांनी आपल्या मुलीच्या साखरपुड्यात एवढा खर्च का केला? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. त्याला आता इंदुरीकर महाराज यांनी उत्तर दिलं आहे, साखर पुड्याच्या कार्यक्रमात जो खर्च करण्यात आला, त्यावर त्यांनी त्याच कार्यक्रमात आपली बाजू स्पष्ट केली आहे.
इंदुरीकर महाराज यांची मुलगी ज्ञानेश्वरी देशमुख आणि साहिल चिलाप यांचा नुकताच साखरपुडा झाला आहे. साहिल चिलाप हे बांधकाम व्यावसायिक असल्याची माहिती समोर येत आहे, त्यांचा मुंबईमध्ये मोठा व्यावसाय आहे, सोबतच त्यांच्या मुळ गावी पुणे जिल्ह्यातल्या जुन्नरमध्ये त्यांची बागायती शेती देखील असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान मुलीच्या साखरपुड्यात झालेल्या खर्चावरून टीका होत असतानाच आता इंदुरीकर महाराज यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले इंदुरीकर महाराज?
विशिष्ट लोकांना फेटे बांधणे आणि विशिष्ट लोकांनी त्यांच्याकडे पहाणे यात आता आपण बदल केला आहे, थोडे लोक मला नाव ठेवतील पण ठेवू द्या, गेले तीस वर्ष लोक मला नावच ठेवत आले आहेत. पण आता बदल करायचा तो असा, इथून पुढे विशिष्ट लोकांचा सत्कारच करायचा नाही, करायचा तर सगळ्यांचा, त्यामुळे आजच्या या कार्यक्रमात मी ठरवून टाकलं की या कार्यक्रमाला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला पांडूरंगाची मूर्ती द्यायची, ही मूर्ती कायम त्यांच्या देवघरात राहील. सर्व सामान्य व्यक्ती त्या मूर्तीला अगरबत्ती लावेल, त्यामुळे सत्कार नावाची गोष्ट आपण बंदच केली आहे, हा एक बदल आपण या कार्यक्रमात केला आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे अनेक लोकांची माझ्याबद्दल अशी तक्रार आहे की, इंदुरीकर महाराज प्रत्येक किर्तनात सांगतात लग्न साधे करा, लग्न साधे करा म्हणून, मग मी या साखरपुड्यात एवढा खर्च का केला तर त्याचं उत्तर असं आहे की तो तुम्हाला दाखवण्यासाठी केला आहे. तुम्हाला हे दाखवण्यासाठी केला की आपण बदल करू शकतो, बदल करण्याची आपली ताकद आहे. जेवण आपण महाराष्ट्रीयनच ठेवलं आहे, कारण आपलं 96 कुळी खानदान आहे, चायनीज वगैरे आपल्याकडे चालणार नाही असंही यावेळी इंदुरीकर महाराज यांनी म्हटलं आहे.


