नाग चैतन्यसह नागार्जुनही भडकलेले !
अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि तिचा पूर्व पती नाग चैतन्य यांच्या घटस्फोटाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी तेलंगणामधील काँग्रेसच्या मंत्री कोंडा सुरेखा यांनी अखेर जाहीर माफी मागितली आहे.
जवळपास वर्षभरानंतर त्यांनी एक्स (ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट लिहित दाक्षिणात्य अभिनेते नागार्जुन यांची माफी मागितली आहे. नागार्जुन यांनी कोंडा सुरेखा यांच्या वक्तव्याविरुद्ध आधीच मानहानीचा खटला दाखल केला होता. हा खटला सध्या न्यायालयात सुरू आहे. त्यादरम्यान मंगळवारी मध्यरात्री त्यांनी ट्विट करत जाहीर माफी मागितली आहे. ‘नागार्जुन यांच्या कुटुंबाविरुद्ध केलेल्या वादग्रस्त टिपण्ण्यांबद्दल मला पश्चात्ताप आहे’, असं त्यांनी त्यात म्हटलंय. नागार्जुन यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याच्या पार्श्वभूमीवर कोंडा सुरेखा यांनी दिलेला माफीनामा सध्या चर्चेत आला आहे.
कोंडा सुरेखा यांचा माफीनामा
कोंडा सुरेखा यांनी मध्यरात्री 12 नंतर त्यांच्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाऊंटवर हा माफीनामा पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी स्पष्ट केलं की नागार्जुन आणि त्यांच्या कुटुंबाचा अपमान करण्याचा त्यांचा कोणताही हेतू नव्हता. जर माझ्या टिप्पण्यांमुळे भावना दुखावल्या असतील तर, तर मी माफी मागते आणि त्याबद्दल खेद व्यक्त करते. मी माझं वक्तव्य मागे घेते, असं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलंय.
नेमकं काय म्हणाल्या होत्या कोंडा सुरेखा?
बीआरएसचे कार्यकारी अध्यक्ष केटीआर यांच्यावर टीका करताना मंत्री कोंडा सुरेखा यांनी नाग चैतन्य आणि समंथायांच्या घटस्फोटाचा उल्लेख खोचकरित्या केला होता. “केटीआर यांच्यामुळेच 100 टक्के नाग चैतन्यचा घटस्फोट झाला आहे. कारण एन. कन्वेन्शन हॉलवर हातोडा पडू नये म्हणून तुम्हाला समंथाला माझ्याकडे पाठवावं लागलं होतं. नागार्जुन यांनी समंथाला केटीआर यांच्याकडे जाण्यास भाग पाडलं होतं आणि ते म्हणाले, एकतर तू (समंथा) आमचं म्हणणं ऐक किंवा घटस्फोट दे. त्यामुळेच हा घटस्फोट झाला. संपूर्ण इंडस्ट्रीला याबद्दल माहीत आहे”, असं कोंडा सुरेखा यांनी म्हटलं होतं. सुरेखा यांच्या या वक्तव्यावरून तीव्र प्रतिक्रिया उमटायला सुरुवात होताच त्यांनी समंथाची जाहीर माफी मागितली होती.
नाग चैतन्यची संतप्त प्रतिक्रिया
कोंडा सुरेखा यांच्या टिप्पणीनंतर नाग चैतन्यने सोशल मीडियावर संतप्त पोस्ट लिहिली होती. ‘घटस्फोटाचा निर्णय हा आयुष्यातील सर्वांत वेदनादायक आणि दुर्दैवी निर्णयांपैकी एक आहे. बराच विचार केल्यानंतर मी आणि माझ्या पूर्व जोडीदाराने विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र याबाबत आता अत्यंत निराधार आणि हास्यास्पद गॉसिप होत आहेत. माझ्या पूर्व जोडीदाराबद्दल आणि माझ्या कुटुंबीयांबद्दल असलेल्या आदरापोटी मी आतापर्यंत मौन बाळगलं होतं. मंत्री कोंडा सुरेखा यांनी केलेला दावा फक्त खोटाच नाही तर निव्वळ हास्यास्पद आणि अस्वीकार्य आहे. केवळ प्रसिद्धीसाठी सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आयुष्यातील निर्णयांचा गैरफायदा घेणं आणि शोषण करणं हे लज्जास्पद आहे,’ असं नाग चैतन्यने म्हटलं होतं.


