पुण्यासह राज्यात ATS ची छापेमारी; ४ डॉक्टरांचा पर्दाफाश होणार…
दिल्लीमध्ये लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोटानंतर महाराष्ट्रातही अलर्ट करण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एटीएसकडून राज्यात ठिकठिकाणी शोधमोहीम राबवण्यात येत आहे. दिल्ली स्फोटाचे धागेदोर महाराष्ट्रात असण्याच्या संशयावरून शोध मोहीम हातात घेण्यात आली आहे. दिल्ली स्फोटाच्या आधी अटक केलेल्या चार डॉक्टरांचे महाराष्ट्रात काही संबंध आहेत का? याचा देखील शोध सुरू करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील अनेक शहरं आणि गावांमध्ये ए टी एस ची शोध मोहीम सुरू आहे. अटक केलेले ४ डॉक्टर महाराष्ट्रात आले होते का? या अनुषंगाने एटीएसकडून तपास केला जात आहे. डॉ मुजम्मिल शकील, डॉ आदिल अहमद, डॉ अहमद सय्यद आणि डॉक्टर शाहीन शाहिद या चार जणांना देशातून विविध भागातून अटक केली आहे.
इसीस, जैश- ए मोहम्मद आणि अन्सर घझवत- उल- हिंद या संघटनांशी डॉक्टरांचा संबंध असल्याचे समोर आलेय. हा सगळा प्रकार “व्हाईट-कॉलर टेरर इकोसिस्टम”चा असल्याची माहिती समोर आली आहे. कट्टरपंथी विचारसरणीचे व्यावसायिक आणि विद्यार्थी यांचा यामध्ये सहभागी आहे. शैक्षणिक आणि व्यावसायिक नेटवर्कच्या आडून काम करून एन्क्रिप्टेड चॅनेल्स व धर्मादाय संस्थांच्या माध्यमातून निधी, शस्त्र आणि स्फोटके ने आण करण्याचे समन्वय करत होते, असेही समोर आले आहे.
राजधानी दिल्लीमध्ये ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ एका कारमध्ये ब्लास्ट झाला. यामध्ये १३ जणांचा मृत्यू झाला होता. तर २० पेक्षा जास्त जखमी झाले होते. या स्फोटानंतर गृहमंत्रालयाकडून तात्काळ उच्चस्तरीय बैठक घेऊन आढावा घेऊन सूचना कऱण्यात आली. अटक करण्यात आलेले डॉक्टर कोणत्या कोणत्या राज्यात गेले होते, त्याचे मॅपिंगही करण्यात आले. महाराष्ट्रालाही या पार्श्वभूमीवर अलरट देण्यात आला होता. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून महाराष्ट्र एटीएसकडून विविध ठिकाणी छापेमारी केली जात आहे. मुंब्रा परिसरात मंगळवारी छापा मारला होता. तर आज पुण्यातील कोंढवा परिसरात छापेमारी करण्यात आली.


