वर्षा वरील बैठकीत दादा संतापले; दानवेंचा दावा…
पार्थ पवार प्रकरणी शरद पवारांनी दिलेली प्रतिक्रिया बोलकी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पार्थ पवारांना वाचवू शकत नाहीत. थेट मुख्यमंत्र्यांनी भूमिका घेतल्याशिवाय पार्थ पवार वाचू शकत नाही.
‘वर्षा’ बंगल्यावर जी बैठक झाली त्यात अजित पवारांनी संतप्त भूमिका घेतली होती. यात त्यांनी सरकारमधून बाहेर पडण्याचीही भाषा केली असा दावा विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दावा केला आहे.
याबाबत अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेत म्हटलं की, वर्षावरील बैठकीत जे घडले त्यावर मला बोलायला वेळ मिळाला नाही. परंतु माझ्या माहितीप्रमाणे, त्यादिवशी जी बैठक झाली, त्यात अजित पवारांनी रागाने सरकारमधून बाहेर पडून बाहेरून सरकारला पाठिंबा देऊ इथपर्यंतची भूमिका घेतल्याचं आमच्या कानावर आले आहे. खरे खोटे बाहेर येईल. अजित पवारांच्या या भूमिकेमुळे त्यांना आणि पार्थ पवारांना वाचवले जात आहे असं मला वाटते असं त्यांनी सांगितले.
तसेच पुण्यातील प्रकरणाबाबत भाजपाला माहिती होती, हे सर्व उघड झाल्यानंतर अजित पवार अडचणीत येतील हा त्यांचा उद्देश होता. ही मोडस ओपरेंडी आहे. आता अजित दादांची फाईल तयार केली आहे. उद्या जर अजित पवारांनी काही केले तर एक मिनिटांत पार्थ पवारांना अटक होऊ शकते. हे भाजपाचे षडयंत्र आहे. त्यातूनच पार्थ पवार प्रकरण बाहेर आले असा दावाही अंबादास दानवे यांनी केला.
दरम्यान, भाजपानेच प्रकरण बाहेर काढायचे, संबंधितांनी आपलं ऐकलं पाहिजे अशा दृष्टीने प्रयत्न करायचे. भाजपाची मोडस ओपरेंडी ही गुन्हेगारी स्वरुपाची आहे. एकीकडे महार वतनाची जमीन विकली जाते. कंपनीचा संचालक म्हणून पार्थ पवार याच्यावर कारवाई का होत नाही. मुंद्राक शुल्क माफ केले जाते. दुसरीकडे व्यवहार रद्द झाला सांगतात, मात्र कायद्याने व्यवहार रद्द झाला तरीही मुंद्राक शुल्क भरावेच लागेल असं अधिकारी सांगतायेत. त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांनी जी भूमिका घेतली ती चूक आहे. भाजपा पार्थ पवारांना वाचवण्याचा प्रयत्न करतेय. लोकसभेला लढणारा माणूस बाळ नाही. एक भारताचा नागरीक आणि गुन्हेगार म्हणून त्यांना वागवले पाहिजे अशीही मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे.


