मोठ्या कटाचा खुलासा; असे वाचवले देशाला…
दिल्लीतील लाल किल्ला परिसरात कारमध्ये स्फोट घडवून आणण्यात आला. केंद्राने हा दहशतवादी हल्ला असल्याचे जाहीर केले. गडबडीत हा स्फोट घडवून आणण्यात आला. दहशतवाद्यांचे येत्या 6 डिसेंबर रोजी अयोध्यासह देशातील बड्या शहरात बॉम्ब स्फोट घडवून आणण्याचा कट होता.
व्हाईट कॉलर दहशतवादी डॉक्टर्सचे नेटवर्क तपास यंत्रणांनी उघड केले आहे. पण जम्मू आणि काश्मीरमधील या डॅशिंग अधिकाऱ्यामुळे त्यांचे मनसुबे उधळले गेले. या कणखर अधिकाऱ्यामुळे देशातील अनेक शहरं सुरक्षित राहिली.
17 ऑक्टोबर रोजी जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील नौगाम येथे उर्दू भाषेत एक पोस्टर लावण्यात आले होते. यावर जैश-ए-मोहम्मदचा सदस्य आणि कमांडर हंजला याची स्वाक्षरी होती. सुरुवातीला हे पोस्टर अगदी साधं वाटत होतं. पण श्रीनगर येथील वरिष्ठ पोलीस अधिक्षक (SSP) डॉ. जीवी संदीप चक्रवर्ती यांना हे पोस्टर खटकलं. त्यांना हा मोठ्या कटाचा भाग असल्याचे लागलीच जाणवलं.
काश्मीर भागात डॉ जीवी संदीप हे दहशतवाद्यांचे काळ म्हणून ओळखले जातात. त्यांनी ऑपरेशन महादेवचे नेतृत्व केले होते. जीवी संदीप यांनी जैशचे हे पोस्टर कुणी लावलं याचा तपास सुरु केला. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यातून तीन डॉक्टर्सची नावं समोर आली. त्यातील काहींचा दगडफेकीत समावेश असल्याचे समोर आले. मग त्यांनी त्यातील एकाला अटक केली आणि दहशतवाद्यांचे नेटवर्क उघड झाले.
यानंतर पोलिसांनी जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी मॉड्यूलचा खुलासा केला. त्यात काश्मिरमधील अनेक डॉक्टरांचा समावेश असल्याचे समोर आले. तर पुढे फरीदाबाद आणि इतर परिसरातून पोलिसांनी 2900 किलोची स्फोटकं जप्त केली. बॉम्ब तयार करण्याचे साहित्य आणि रायफल जमा केली. 10 नोव्हेंबरच्या धमाक्यानंतर आता या सर्व कड्या जुळवल्या जात आहे. पण आयपीएस अधिकारी जीव्ही संदीप यांच्या त्यावेळेच्या एका निर्णयामुळे देशातील इतर शहरातही धमाके करण्याचा दहशतवाद्यांचा कट उधळला गेला.
वर्दीतील डॉक्टर दहशतवाद्यांवर भारी
डॉ. जीवी संदीप चक्रवर्ती यांचा जन्म आंध्र प्रदेशातील कुरनूलमधील एक मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील डॉ. जीवी राम गोपाल राव हे सरकारी रुग्णालयात निवासी वैद्यकीय अधिकारी तर आई पीसी रंगम्मा आरोग्य विभागात अधिकारी होत्या. त्यांचे प्राथमिक शिक्षण कुरनूल येथील ए कॅम्पमधील मोंटेसरी पब्लिक स्कूलमधून झाले. पुढे शिक्षण पूर्ण झाल्यावर ते 2014 मध्ये भारतीय पोलीस सेवेत दाखल झाले.


