वनमंत्री गणेश नाईकांनी सांगितले ‘हे’ कारण…
पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बिबट्यांचा वावर वाढला असून बिबटे मानवावर हल्ले करू लागले आहेत. या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होऊ लागताच,”बिबट्या दिसला तर त्याला ऑन द स्पॉट शूट करा,” असे धक्कादायक विधान वनमंत्री गणेश नाईक यांनी केले होते.
त्यावरून टिका होत असतानाही गणेश नाईक यांनी ठाण्यात पुन्हा या वाक्याचा पुनर्रच्चार केला आहे. त्याचबरोबर पुणे जिल्ह्यात बिबटे वाढण्याचे कारणही सांगितले.
पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बिबट्यांचा वावर वाढला असून बिबटे मानवावर हल्ले करू लागले आहेत. पिंपरखेड येथील बिबट्याच्या हल्ल्यात शिवन्या बोंबे (५), रोहन बोंबे (१३) या मुलांचा, तसेच जांबूत येथील भागूबाई रंगनाथ जाधव या ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला. शिरूर तालुक्यात आतापर्यंत बाराहून अधिक नागरिकांना बिबट्याच्या हल्ल्यात जीव गमवावा लागला आहे.
या पार्श्वभूमीवर वनमंत्री गणेश नाईक यांनी पिंपरखेड गावाला भेट देऊन बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले होते. तसेच पुणे जिल्ह्यात बिबटे पकडण्यासाठी १२०० पिंजरे देण्यात येणार असून त्यातील २०० पिंजरे देण्यात आले आहेत. बिबट निवारण केंद्रातील बिबटे घेऊन जाण्यास गुजरातमधील ‘वनतारा’च्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे. नसबंदी हाही एक उपाय अमलात आणण्यात येणार आहे.आफ्रिकेत सिंह आहेत, इतर काही प्राणी आहेत. मात्र, तिथे बिबटे नाहीत. तेथेही बिबटे पाठविण्य़ात येणार आहेत, असे नाईक त्यावेळी म्हणाले होते
बिबट्याला ऑन द स्पॉट शूट करा
बिबट्या दिसला तर त्याला ऑन द स्पॉट शूट करा, असे धक्कादायक विधान वनमंत्री गणेश नाईक यांनी केले होते. त्यावरून त्यांच्यावर प्राणीप्रेमींकडून टिका होत आहे. वन्यजीव संरक्षण कायदा वनमंत्र्यांनी वाचला आहे का, तसेच मानव आणि बिबटे संघर्षावर हा उपाय असू शकतो का, असा प्रश्न वन्यजीव अभ्यासकांकडून उपस्थित केला जात आहे.
मारून मारून किती बिबट मारणार, त्याने प्रश्न सुटणार आहे का, असे अनेक प्रश्नही उपस्थित होत आहेत. एकूणच त्यांच्या विधानावर सर्वत्र टिका होत असतानाच, त्यांनी ठाण्यात पुन्हा याच विधानाचा पुनर्रच्चार केला आहे. बिबट्याने पाच वर्षाची मुलगी, अकरा वर्षाचा मुलगा आणि ८३ वर्षीय आजीला भक्ष बनवले. या सर्वांच्या घरी गेलो, तेव्हा त्यांचे दु:ख बघून मला थोडीशी लाज वाटली. या लोकांच्या डोळ्यातून सातत्याने अश्रू येत आहेत. पैसा दिला तरी त्याने काही माणस परत येणार नाहीत. त्यामुळे बिबट्या हा प्राणी स्वतः कसलाही मर्यादा न ठेवता, माणसांवर हल्ला करणारा असेल तर हल्ला करताना त्या बिबट्याला ऑन द स्पॉट शूट करा, असे आदेश दिले आहेत, असे नाईक म्हणाले.
बिबटे वाढण्याचे कारण पुणे जिल्ह्यात चार धरण आहेत. या जिल्ह्यात पुर्वी मोठ्या प्रमाणात उसाची शेती होत नव्हती. आता येथे मोठ्या प्रमाणात उसाची शेती होते. या उसाच्या शेती आधाराने बिबट्यांना तिथे अधिवास मिळाला. बिबट्यांना असे वाटत आहे की, उसाचे शेत हेच आमचे अधिवास आहे. एकेकाळी जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांचा वावरच नव्हता. आता तिथे साडे सातशे बिबटे आहेत. तर, ऑफ द रेकॉर्ड बिबट्यांची संख्या एक हजारांच्या पुढे गेली आहे, असे नाईक म्हणाले.


