बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक विजय मिळविला आहे. महागठबंधनचा सुपडा साफ झाला. भारतीय जनता पक्षाला मोठे यश मिळाले आहे. 95 जागांपर्यंत भाजपने पल्ला गाठला आहे.
बिहारमधील भाजपच्या या विजयामागे एक मराठी चेहरा असल्याचे आता समोर आले आहे. बिहारमध्ये एनडीएला मिळालेल्या अभुतपूर्व यशानंतर मुख्यमंत्री पदाची माळ पुन्हा नितीशकुमार यांच्या गळ्यात पडणार की, बिहार विधानसभेत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या भाजपचा एखादा नेता मुख्यमंत्री होणार हे भाजपच्या पार्लमेंटरी बोर्डच्या बैठकीत ठरणार असल्याचे या नेत्याने सांगितले आहे.
बिहार भाजपचे प्रभारी आणि पक्षाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे हे भाजपच्या घवघवीत यशामागे असल्याचे आता बोलले जात आहे. विनोद तावडे सप्टेंबर 2022 पासून बिहारचे प्रभारी आहेत. विनोद तावडे बिहारचे प्रभारी झाल्यानंतर त्याच्या पुढच्याच महिन्यात नितीशकुमार यांनी एनडीएची (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) साथ सोडून काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलासोबत हात मिळवणी केली होती. भाजपला हा मोठा धक्का होता.
लोकसभा निवडणुकीत नितीशकुमार सोबत नसतील तर बिहारमध्ये भाजपचे काही खरे नाही, हे ओळखून नंतर लोकसभेआधी नितीशकुमार यांना एनडीएसोबत आणण्यात आले. यामध्ये विनोद तावडे यांची रणनीती कामाला आली होती. विनोद तावडे यांनी 2024 मध्ये नितीशकुमार आणि भाजपला पुन्हा जवळ आणले. यामुळे भाजप सत्तेचा सोपान चढू शकली.
बिहार विधानसभा निवडणूक 2025 साठी विनोद तावडे यांनी महाराष्ट्रातीलच पक्षाची रणनीती अंमलात आणली. विरोधी पक्षातील मातब्बर नेत्यांना त्यांनी गळाला लावले आणि भाजपमध्ये त्यांचे पक्षप्रवेश सोहळे सुरु झाले. विविध घटकातील, जात समुहातील नेत्यांना त्यांनी पक्षात आणण्यात महत्त्वाची जबाबदारी पार पाडली.
बिहार विधानसभेसाठी उमेदवारांची निवड करतानाही विनोद तावडे यांनी पडद्यामागून सूत्र सांभाळली. त्यांच्या पडद्यामागील घडामोडी या भाजपच्या विजयासाठी महत्त्वाच्या ठरल्या. भाजप बिहारमध्ये प्रथमच 95 जागांपर्यंत पोहचली आहे.
भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी निवडणुकीची परीक्षा जिंकली आहे. मात्र आता त्याहून कठीम पेपर आगामी काळात त्यांच्यासमोर येणार आहे. बिहारमध्ये मुख्यमंत्रीपदी भाजप की जेडीयू यापैकी कोणाला संधी मिळणार हा आगामी काळातील महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. नितीशकुमार यांच्या नेतृत्त्वात निवडणूक लढण्यात आली. त्यांचा चेहरा पुढे करुन भाजप निवडणुकीला सामोरी गेली असली तरी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार निवडून आलेले सदस्य ठरवतील अशी सावध भूमिका आता तावडेंनी घेतली आहे. नितीशकुमारच पुन्हा मुख्यमंत्री होतील असे स्पष्टपणे सांगण्याचे भाजप नेते आता टाळायला लागले आहे.


