बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल कसा लागणार?
कोणाला बहुमत मिळणार, एनडीएची पुन्हा एकदा सत्ता येणार की? महाआघाडी बाजी मारणार याबाबत मोठी उत्सुकता होती, अखेर ही उत्सुकता आता संपली आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये एनडीएचा दणदणित विजय झाला आहे, तर महाआघाडी विशेष: काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. सध्या समोर येत असलेल्या निकालानुसार भाजप सर्वाधिक म्हणजे 95 जागांवर आघाडीवर आहे, भाजप बिहारमधील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर नितीशकुमार यांच्या जेडीयूचा नंबर आहे. जेडीयू सध्या 82 जांगावर आघाडीवर आहे. तर या निवडणुकीमध्ये एलजेपीला देखील मोठं यश मिळालं आहे, या निवडणुकीत एलजेपी 20 जागांवर विजयी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान दुसरीकडे महाआघाडीला मात्र मोठा दणका बसला आहे. महाआघाडीचे उमेदवार केवळ 30 जागांवर आघाडीवर आहेत. तर सात ठिकाणी अपक्ष उमेदवार आघाडीवर आहेत. काँग्रेसची अवस्था तर खूपच बिकट बनली आहे, काँग्रेसचे उमेदवार अवघ्या तीन जागांवर आघाडीवर आहेत. दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी एक पोस्ट केली आहे, ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.
नेमकं काय म्हणाले रोहित पवार?
हरियाणा, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीकडे जनतेचा कौल होता. हे चित्र पोस्टल मतदानात देखील स्पष्ट झाले होते. EVM व्होटिंगदरम्यान पहिला एक तास हा कल पोस्टलप्रमाणेच राहिला. परंतु पुढच्या एक दीड तासात सर्व चित्र पालटले. भाजपा आश्चर्यकारक रित्या पुढे गेली आणि धक्कादायक निकाल समोर आला. आज सेम-टू-सेम याच पद्धतीचे चित्र बिहार निवडणुकी दरम्यान निकाल येताना दिसत आहे. येणाऱ्या निकालाने मतदान मोजणीत घोळ होतो यावर शिक्कामोर्तब झालं आहे. सरकारचं बुजगावणं झालेल्या यंत्रणा, निवडणूक आयोग यामुळे एकंदरीतच लोकशाही आणि पर्यायाने आरक्षण व संविधान धोक्यात आलंय हे नक्की! महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा गुवाहाटी व्हाया सुरत जसा प्रवास झाला तसाच निवडणूक निकाल लावण्याचा आयोगाचा प्रवास हरियाणा टू बिहार व्हाया महाराष्ट्र असा दिसून येतो. असो, हि निवडणूक थेट बिहारची जनता विरुद्ध इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्यात आहे.
तेजस्वी यादव यांना मिळालेला प्रतिसाद त्यांच्या सभांमध्ये उसळलेला जनसागर आणि त्यांनी युवांचे, शेतकऱ्यांचे मांडलेले प्रश्न बघता आजचा निकाल काहीही लागला, तरी जनतेची खरी पसंद आणि जनतेच्या मनातला मुख्यमंत्री मात्र तेजस्वी यादव आहेत यात तिळमात्र शंका नाही,’ अशी पोस्ट रोहित पवार यांनी केली आहे.
बिहार निवडणुकीमध्ये काँग्रेसला सर्वात मोठा धक्का बसला आहे, काँग्रेस अवघ्या तीन जागांवर आघाडीवर आहे, तर संपूर्ण महाआघाडी केवळ 30 जांगावर आघाडीवर आहे. भाजप या निवडणुकीमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.


