पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाकीत; मोदींच्या दाव्याने मोठी खळबळ !
बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला, या निवडणुकीमध्ये काँग्रेससह महाआघाडीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागाला, तर एनडीएला मोठं यश मिळालं आहे. भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.
दरम्यान यानंतर जनतेशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे, तसेच यावेळी बोलताना त्यांनी मोठं भाकीत देखील केलं आहे, येणाऱ्या काळात काँग्रेसमध्ये मोठी फूट पडेल असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच यावेळी बोलताना त्यांनी एनडीएला दिलेल्या स्पष्ट बहुमताबद्दल बिहारच्या जनतेचे आभार देखील व्यक्त केले आहेत.
नेमकं काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
एका विधानसभेत आम्हाला जेवढ्या जागा मिळाल्या तेवढ्या जागा काँग्रेसला लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या निवडणुकीतही मिळाल्या नाहीत. काँग्रेसचा निवडणुकीचा आधार केवळ निगेटिव्ह झाला आहे. चौकीदार चोर म्हणायचं, कधी ईव्हीईएमवर आरोप, कधी मतचोरीचा आरोप, कधी निवडणूक आयोगाला शिव्या घालणं, देशाच्या शत्रूचे अजेंडे समोर आणणं सुरू आहे. काँग्रेसकडे पॉझिटिव्ह व्हिजन नाहीये. आज काँग्रेस मुस्लिम लीगी माओवादी काँग्रेस म्हणजे एमएमसी झाली आहे. ही काँग्रेस मुस्लिम लीगी माओवादी काँग्रेस आहे. आणि काँग्रेसचा संपूर्ण अजेंडा त्यावरच चालत आहे. त्यामुळे काँग्रेसमध्येही दुसरा गट निर्माण होत आहे. हा गट निगेटिव्ह पॉलिटिक्सच्या विरोधात आहे. जे काँग्रेसचे नेते निगेटिव्हि पॉलिटिक्स घेऊन जात आहे, त्याच्या विरोधात अंतर्गत धुसफूस सुरू आहे. मला वाटतं येणाऱ्या काळात काँग्रेसमध्ये मोठी फूट पडेल, असं यावेळी मोदी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, काँग्रेसच्या मित्र पक्षांनाही कळतंय की काँग्रेस त्यांच्या निगेटिव्ह पॉलिटिक्समध्ये सर्वांना घेऊन डुबत आहे. त्यामुळेच मी बिहार निवडणुकीत सांगितलं होतं की काँग्रेसचे नामदार तलावात डुबकी मारून बिहार निवडणुकीत स्वत डुबण्याची आणि इतरांना डुबवण्याची प्रॅक्टिस करत आहेत. मी आधीही या मंचावरून काँग्रेसच्या साथीदारांना सावधान केलं होतं. काँग्रेस ही परजीवी आहे, ते आपल्या सहकाऱ्यांचे व्होट बँक घेऊन पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे काँग्रेसच्या मित्रपक्षांनी त्यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे, असा हल्लाबोल यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केला आहे.


