ठाणे-मुलुंड दरम्यान स्टेशन; नवीन पादचारी पुलासाठी…
ठाणे : मुंबई, ठाणे, भिवंडी पट्ट्यातील उपनगरीय रेल्वे प्रवाशांच्या प्रश्नांवर शिवसेना – मविआ खासदारांनी मंगळवारी दिल्लीतील संसद भवनात रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीत आवाज उठवला.
प्रलंबित विकासकामे, ठाणे – मुलुंड स्थानकादरम्यानच्या नवीन रेल्वे स्थानकाच्या कामात होत असलेली दिरंगाई अशा मुद्द्यांवरून खासदार आक्रमक झाले. ही विकासकामे तातडीने मार्गी लावण्याची मागणी करत प्रवाशांना सोयीसुविधा पुरविण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या मुजोर अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी कारवाई करण्याची सूचनाही यावेळी खासदार नरेश म्हस्के यांनी केली.
रेल्वेच्या सल्लागार समितीची बैठक केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री वी. सोमन्ना, रवनीत सिंह उपस्थित होते. या समितीत देशभरातील १५ खासदार हे सदस्य म्हणून सहभागी होतात. या समितीचे सदस्य म्हणून शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के, शिवसेना (उबाठा) संजय पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सुरेश म्हात्रे असे महाराष्ट्रातील खासदार या बैठकीत सहभागी झाले होते
यावेळी ठाणे, मुंबई, भिवंडी लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित विकासकामे, महाराष्ट्राच्या सर्वपक्षीय खासदारांच्या रेल्वेविषयक समस्या, देशापातळीवरील रेल्वेच्या मुलभूत प्रश्नांविषयी या खासदारांनी महत्वपूर्ण सूचना केल्या. अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत ठाणे रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणाचा ९४९ कोटींचा प्रस्ताव मध्य रेल्वेने रेल्वे बोर्डाकडे पाठविला असून तो अद्याप प्रलंबित आहे. या प्रस्तावाला तात्काळ मंजूरी देण्याची मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केली.
नव्या ठाणे रेल्वे स्थानकाचे कामावर चर्चा
ठाणे ते मुलुंड स्थानकादरम्यान नवीन रेल्वे स्थानकाच्या कामात होत असलेली दिरंगाई दूर करुन तातडीने काम सुरु करावे, ठाणे स्थानकात मुलुंडकडे जाणारा नवीन पादचारी पूल त्वरित बांधण्याची आवश्यकता आहे. हा पूल प्लॅटफॉर्म क्रमांक १ ला प्लॅटफॉर्म क्रमांक ७ आणि ८ ला जोडेल. तसेच स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिम बाजूंना जोडेल. ज्यामुळे प्रवाशांची गर्दी नियंत्रित करण्यात आणि त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यात मोठी मदत होईल
ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक ७, ८ आणि ९, १० येथे स्वयंचलित जिन्यांची उभारणी करणे गरजेचे आहे. अशा विविध आग्रही मागण्या खासदार म्हस्के यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे बैठकीत केल्या. यावेळी खासदार पाटील आणि म्हात्रे यांनीही या मागण्यांना पाठिंबा देत हे प्रश्न तातडीने सोडविण्याची विनंती रेल्वेमंत्री वैष्णव यांच्याकडे केल्याचे म्हस्के यांनी सांगितले.
.


