पालघर: जनसामान्यांच्या आशाआकांक्षा पूर्ण करणारी नगरपरिषद आपल्याला हवी आहे. हा बदल घडवण्यासाठीच आम्ही येथे आलो आहोत. पालघरमधील नैसर्गिक विविधतेला हानी न पोहोचवता आम्ही विकासाचा आराखडा तयार केला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे केले.
भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार कैलास म्हात्रे तसेच नगरसेवक यांना निवडून द्या, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री गणेश नाईक, खा. हेमंत सवरा आ. राजन नाईक, आ. हरिश्चंद्र भोये, आ. स्नेहा दुबे, आ. ज्ञानेश्वर म्हात्रे, नगराध्यक्षपदाचे उमेदवार कैलास म्हात्रे आदी मंचावर उपस्थित होते.
शहरीकरणाला अभिशाप मानू नका, संधी माना, असे पंतप्रधान मोदी नेहमी म्हणतात. ६५ टक्के जीडीपी हा शहरातून येतो. त्यामुळे विकासाची संधी शहरात तयार होते. आपण पालघरमध्ये चौथी मुंबई उभारणार आहोत. पालघरची तेवढी क्षमता आहे व हे करताना या जिल्ह्यात जल, जंगल, जमीन नैसर्गिक याच्या वैविध्यास हानी पोहोचणार नाही याची काळजी घेतली जाईल. त्या दृष्टीनेच पालघरच्या विकासाचा आराखडा तयार केला आहे, असे ते म्हणाले.
पालघर जिल्हा हा वेगाने विकसित होत आहे. रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने वाढवणसारखे बंदर येथे उभारले जाणार आहे. केंद्र सरकारने यासाठी एक लाख कोटींच्या खर्चास मंजुरी दिली आहे. हे बंदर देशातील सर्वांत मोठे आणि जगातील पहिल्या १० बंदरांमधील एक बंदर होईल. मात्र ते करताना मासेमारी करणाऱ्या बांधवांवर कुठलीही गदा येणार नाही. या बंदरामुळे दहा लाख रोजगार निर्माण होतील. यामध्ये भूमिपुत्रांना प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर या जिल्ह्याला मुख्यालय नव्हते. मात्र मुख्यमंत्री या नात्याने मी निर्णय घेत या मुख्यालयासाठी विशिष्ट योजना आखली. आज मला सांगताना आनंद वाटतो की, आपल्या देशामध्ये सर्वांत चांगली जिल्हा मुख्यालयाची कार्यालये कुठे असतील तर ती या पालघरमध्ये आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
डहाणूचा विकास होणारच
डहाणू : डहाणू आणि पालघरच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट उपस्थितांसमोर सादर करून केंद्र व राज्याप्रमाणेच पालघर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर भाजपची सत्ता आणा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे केले. डहाणू नगरपरिषदेच्या निवडणुक प्रचारसभेसाठी ते डहाणूत आले होते. डहाणू निसर्गसंपन्न असून विकास करताना निसर्गाचा विनाश करायचा नाही. जैवविविधता अबाधित ठेवताना डहाणूचा विकास रखडला, आता शाश्वत विकास नियंत्रण नियमावली तयार करायची आहे. भुयारी गटाराची व्यवस्था, सांडपाण्यावर प्रक्रिया, मैलापासून खतनिर्मिती, प्रधानमंत्री आवास योजना आदींच्या अंमलबजावणीची त्यांनी ग्वाही त्यांनी दिली.
लाडकी बहीण योजना एका पक्षाची नाही
नागपूर : नगरपरिषद, नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान लाडकी बहीण योजनेच्या श्रेयवादावरून महायुतीतील पक्षांकडून दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. बुधवारी नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथे प्रचारासाठी आले असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, लाडकी बहीण योजना ही कोणत्याही एका पक्षाची नसून महायुतीची आहे. राज्यात महायुतीची सत्ता असून या सरकारच्या योजना आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. ‘निवडणुकीत लोकांना मतांचा जोगवा मागणे यालाच लोकशाही म्हणतात. त्यामुळे आम्ही लोकांमध्ये जातो. घरी बसून राजकारण करण्यास लोकशाही म्हणत नाहीत. कोणी लोकांकडे जात नसेल तर तो त्यांचा प्रश्न आहे, असे म्हणत फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावला.


