विरोधी पक्षाचं विधिमंडळातील अस्तित्व धोक्यात…
बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांनी आपल्या कामाला जोरदार सुरूवात केली आहे. मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत उद्योग आणि रोजगारवाढीसाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत.
पुढील पाच वर्षांत राज्याचा चेहरामोहरा बदलण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. पण दुसरीकडे विरोधी पक्षांना कमजोर करण्यासाठीही हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे.
एनडीएला बिहारमध्ये 2010 नंतरचे सर्वात मोठे बहुमत मिळाले आहे. विरोधा पक्षांना 243 पैकी 50 जागाही जिंकता आल्या नाहीत. सरकारला पुढील पाच वर्षे कसलाही धोका नाही. पण असे असूनही विरोधी पक्षांची ताकद कमी करण्यासाठी एनडीएकडून प्रयत्न सुरू असल्याचा दावा विरोधी पक्षातील नेत्यांनी केला आहे.
बिहारमध्ये बहुजन समाज पक्षाचा एक आमदार निवडून आला आहे. पक्षाचे उमेदवार सतीश कुमार सिंह यादव यांनी भाजपचे उमेदवार अशोक कुमार सिंह यांचा केवळ 30 मतांनी पराभव केला आहे. त्यामुळे हा पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. आता या आमदाराला आपल्याकडे वळविण्यासाठी एनडीएचा प्रयत्न असल्याचा आरोप बसपा नेत्यांनी केला आहे.
बसपाचे राष्ट्रीय संयोजक आकाश आनंद यांच्य उपस्थित बुधवारी पटना येथे पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीत पक्षाचे बिहार प्रभारी अनिल कुमार यांनी दावा केला की. सत्ताधारी पक्षाकडून आमदार सतीश यादव यांच्याशी सातत्याने संपर्क साधला जात आहे. त्यांच्यावर दबाव टाकला जात आहे. पण ते कोणत्याही दबावाखाली येणार नाहीत.
वर्ष 2020 च्या निवडणुकीतही बसपाचे मोहम्मद जमा खान हे एकमेव आमदार निवडून आले होते. पण त्यांनी २०२१ मध्य जेडीयूमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांना नितीश कुमार यांनी कॅबिनेट मंत्री बनविले होते. खान यांनी यावेळीही जेडीयूच्या तिकीटावर विजय मिळवला आहे. यावेळी ते मंत्री बनले असून मंत्रिमंडळातील एकमेव मुस्लिम मंत्री आहेत.
यापार्श्वभूमीवर बसपाने आपल्या एकमेव आमदाराला फोडण्यासाठी सत्ताधारी पक्ष प्रयत्न करत असल्याच्या दाव्याने विरोधकांमध्ये खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता इतर विरोधी पक्षही सावध झाले आहेत. विरोधी पक्षाला जेरीस आणण्यासाठी इतर आमदारांनाही आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, अशी चर्चा आता बिहारच्या राजकारणात सुरू झाली आहे.


