केंद्रात आणि राज्यात…
भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना राज्यात सत्तेत एकत्र असले तरी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही पक्ष एकमेकांसमोर आलेत. कोकणात तर या दोन्ही पक्षातील वाद एवढा विकोपाला गेलाय की, भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी थेट युती कधीपर्यंत टिकवायची याची तारीखच जाहीर केली आहे.
सिंधुदुर्गमध्ये भाजप नेते नितेश राणे यांच्याविरोधात त्यांचे बंधू तथा शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी दंड थोपटले आहेत. नुकतंच निलेश राणे यांनी मालवणमध्ये भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात 25 लाखांची रोकड शोधण्याचे स्टिंग ऑपरेशन केलं. हे ऑपरेशन भाजपच्या चांगलंच जिव्हारी लागल्याचं पाहायला मिळत आहे.
कारण निलेश राणेंनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनवर प्रतिक्रिया देताना भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी थेट, ‘मला २ डिसेंबरपर्यंत युती टिकवायची आहे. त्यानंतर मी निलेश राणेंना उत्तर देईन. आत्ता मी काहीही बोलणार नाही. नंतर उत्तर देईन. निलेश राणे जे बोलत आहेत ते खोटं आहे.’ अशी संतप्त प्रतिक्रिया दिली.
त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे आता राज्यातील महायुती तुटणार का, दोन तारखेनंतर युती राहणार नाही का? अशा चर्चांना उधाण आलं आहे. याच चर्चा सुरू असताना आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी चव्हाणांना प्रत्युत्तर दिलं आहे.
मित्र पक्षांनी एकमेकांबद्दल बोलताना तारतम्य बाळगलं पाहिजे. सगळ्यांनी एकमेकांबद्दलची आचारसंहिता पाळली पाहिजे. केंद्रातही आणि राज्यातही युती आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनीही म्हटलंय की, प्रचार करताना खालच्या पातळीवर जाऊ नये.
रवींद्र चव्हाण काय म्हणाले, मला माहित नाही की पण ते असं बोलले असतील तर पुढेही युती टिकवायची आहे का?”, असा प्रश्न श्रीकांत शिंदेंनी उपस्थित केला. या दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यामुळे महायुतीतील कार्यकर्ते मात्र संभ्रमात असून राज्याच्या राजकारणात येत्या दोन तारखेला काही उलथापालथ होणार का? या चर्चांना उधाण आलं आहे.


