इम्रान खानचा मुलगा झाला भावूक; पाकिस्तान सरकारवर गंभीर आरोप !
माझे वडील ८४५ दिवसांपासून अटकेत आहेत. मागील सहा आठवड्यांपासून त्यांना कोणत्याही पारदर्शकतेशिवाय मृत्यूच्या खोलीत एकांतात ठेवले गेले आहे”, असे सांगत माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा मुलगा कासिम खान याने पाकिस्तान सरकारवर संताप व्यक्त केला आहे.
कासिम खान याने एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात सरकार आणि सरकारचे आका असे म्हणत इशारा दिला आहे.
इम्रान खान यांचा मुलगा कासिम खानने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, “त्यांच्या बहिणींना त्यांना (इम्रान खान) भेटू दिले जात नाही. इतकंच नाही, तर न्यायालयाने स्पष्ट आदेश देऊनही त्यांना परवानगी नाकारण्यात आली. ना कॉल करू दिला जात आहे, ना भेट घेऊ दिली जात आहे. इतकंच काय तर ते जिवंत असल्याचा कोणता पुरावाही नाहीये.”
…म्हणून हे जाणीवपूर्वक केलं जात आहे
“माझा आणि माझ्या भावांचा माझ्या वडिलांशी (इम्रान खान) कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. हा पूर्णपणे ब्लॅकआऊट सुरक्षा प्रोटोकॉल नाहीये. हे सगळं त्यांची परिस्थिती लपवण्यासाठी आणि ते व्यवस्थित आहेत की नाही, याबद्दल आमच्या कुटुंबाला जाणून घेण्यापासून रोखण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न आहे”, असा गंभीर आरोप कासिम खानने केला आहे.
कासिम खानने पुढे म्हटले आहे की, “मी पाकिस्तान सरकार आणि त्यांच्या आकांना स्पष्ट शब्दात सांगू इच्छितो की, माझ्या वडिलांची सुरक्षा आणि त्यांना निर्दयीपणे वेगळं ठेवण्यासाठी कायदेशीर, नैतिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरून उत्तर मागितले जाईल.”
“मी आंतरराष्ट्रीय समुदायाला, जागतिक मानवाधिकार संघटना आणि लोकशाहीचा आवाज असलेल्या प्रत्येकाला आवाहन करतो की, त्यांनी तातडीने यात हस्तक्षेप करावा. ते (इम्रान खान) जिवंत असल्याचा पुरावा मागावा. न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करावे आणि या अमानवीयपणे वेगळ ठेवणे बंद करावे. पाकिस्तानातील सर्वात लोकप्रिय राजकीय नेत्याला मुक्त करण्याचे आवाहन करावे. त्यांना केवळ राजकीय सुडाने अटकेत ठेवण्यात आले आहे”, असे भावूक आवाहन कासिम खानने वडील इम्रान खान यांच्यासाठी केले आहे.
इम्रान खान कुठे आणि कसे आहेत? पाकिस्तान गोंधळ
माजी पंतप्रधान इम्रान सध्या कुठे आहेत आणि त्यांची प्रकृती कशी आहे? या प्रश्नावरून संपूर्ण पाकिस्तान गोंधळ उडाला आहे. त्यांचे समर्थक आता आंदोलन करू लागले आहेत. त्यांच्या प्रकृतीबद्दल वेगवेगळ्या अफवा पसरू लागल्या आहेत. रावळपिंडी तुरुंगाबाहेर त्यांच्या समर्थकांनी रात्रभर आंदोलन केले.
शहबाज शरीफ सरकारकडून इम्रान खान यांच्याबद्दल पसरत असलेल्या अफवांवर खुलासा करताना सांगण्यात आले की, एम्रान खान यांची प्रकृती व्यवस्थित आहे. त्यांना इतर कुठल्याही ठिकाणी हलवण्यात आलेले नाही.
असे असले तरी त्यांचे समर्थक प्रश्न विचारत आहेत की, जर ते जर व्यवस्थित आहे, तर मग त्यांच्या कुटुंबीयांना त्यांची भेट का घेऊ दिली जात नाही. त्यांच्या पक्षाच्या नेत्याला त्यांची भेट का घेऊ दिला जात नाही. भेट घेऊन द्यावी आणि काय ते एकदा सगळे समोर येऊ द्यावे, अशी मागणी इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाचे नेते करत आहेत.


