अंबाडी कातकरी वाडीत अनेक वर्षांच्या संघर्षानंतर विवेक पंडित यांच्या शुभहस्ते रात्री पाणी सुरु झाले
ठाणे जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी, विकी जाधव
भिवंडी, ८ डिसेंबर २०२५ —
भिवंडी तालुक्यातील अंबाडी येथील कातकरी आदिवासी वाडीत गेल्या अनेक पिढ्यांपासून पिण्याच्या पाण्याची कोणतीही शाश्वत व्यवस्था नव्हती. वाडीतील महिलांना व लहान मुलींना दररोज तब्बल १.५ किलोमीटर अंतर पायवाटेने चालत जाऊन पाणी भरावे लागत होते. या गंभीर अमानवी परिस्थितीविरोधात श्रमजीवी संघटनेने सातत्याने संघर्ष उभारला आणि अखेर आज, सोमवार ८ डिसेंबर २०२५ रोजी रात्री श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांच्या शुभहस्ते बोरवेल पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन करून वाडीत अधिकृतपणे पाणी सुरू करण्यात आले.
अनेक वर्षांनंतर गावात स्वच्छ व पिण्यायोग्य पाणी मिळाल्याने ज्येष्ठ महिला, तरुणी आणि लहान मुलींंच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. “आता आमच्या मुलींना दूरवर पाणी आणण्यासाठी जावे लागणार नाही,” अशी भावना अनेक महिलांनी व्यक्त केली. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोईर, उपाध्यक्ष लक्ष्मण सवर, तालुका अध्यक्ष आशा भोईर, उपाध्यक्ष जयेश पाटील, कार्यालयीन सचिव प्रतीक्षा सांबरे, लक्ष्मी मुकणे, मुकेश तोरणेकर, कल्पेश पाटील,मंदा सवर, पंढरी पाटील तसेच मोठ्या संख्येने संघटनेचे सभासद, स्थानिक नागरिक, महिला व युवक उपस्थित होते.
हा पाणीप्रश्न केवळ सुविधा नसून तो मानवी मूलभूत अधिकाराचा प्रश्न असल्याचे सांगत विवेक पंडित यांनी श्रमजीवी संघटनेच्या तालुका कार्यकर्त्याचे, गावकमिटीच्या संघर्षाचे कौतुक केले. “श्रमजीवी संघटना ही केवळ आंदोलन करणारी संघटना नसून, आदिवासी व वंचित समाजाच्या मूलभूत हक्कांसाठी लढणारी चळवळ आहे,” असे ते यावेळी म्हणाले.
अंबाडी आदिवासी वाडीत सुरू झालेली ही पाणीपुरवठा योजना म्हणजे अनेक वर्षांच्या संघर्षाचे फळ असून, हा दिवस येथील नागरिकांसाठी ऐतिहासिक ठरला आहे

