फुलसावंगी प्रतिनिधी -अजय पाचंगे
आजच्या डिजिटल युगात जग मोबाईलच्या एका क्लिकवर आले असताना, फुलसावंगी परिसरात मात्र गेल्या दोन दिवसांपासून ‘डिजिटल इंडिया’ची चाके रुतल्याचे चित्र दिसत आहे. रिलायन्स जिओ कंपनीची मोबाईल सेवा आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी पूर्णपणे कोलमडल्याने ग्राहक पुरते त्रस्त झाले असून, “जिओ झाले निर्जीव” अशी म्हणण्याची वेळ स्थानिक नागरिकांवर आली आहे.
मागील ४८ तासांपासून जिओचे टॉवर ‘सिग्नल’ दाखवत नसल्याने केवळ फोन कॉल्सच नाही, तर हायस्पीड इंटरनेटवर अवलंबून असलेली सर्व कामे ठप्प झाली आहेत. नातेवाईक किंवा कामाच्या ठिकाणी साधा फोन करणेही अशक्य झाले आहे. गुगल पे, फोन पे यांसारख्या युपीआय सेवा बंद असल्याने छोट्या व्यापाऱ्यांपासून ते ग्राहकांपर्यंत सर्वांचे आर्थिक व्यवहार रखडले आहेत. घरगुती आणि व्यावसायिक कामांसाठी वापरली जाणारी जिओ फायबर सेवाही बंद असल्याने वर्क फ्रॉम होम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आणि विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हजारो रुपये खर्च करून घेतलेले महागडे स्मार्टफोन सध्या केवळ कॅमेरा किंवा म्युझिक प्लेयर म्हणून वापरावे लागत असल्याची भावना ग्राहकांनी व्यक्त केली आहे. “आम्ही वेळेवर रिचार्ज करतो, मग सेवेच्या बाबतीत ही टाळाटाळ का?” असा सवाल संतप्त ग्राहकांनी विचारला आहे. दोन दिवस उलटूनही कंपनीकडून तांत्रिक बिघाडाबाबत कोणतीही अधिकृत माहिती किंवा सुधारणेचे संकेत न मिळाल्याने नाराजी अधिकच वाढली आहे. फुलसावंगी परिसरातील दुर्गम भागातील नेटवर्कची समस्या नेहमीचीच असली, तरी मुख्य बाजारपेठेत दोन दिवस सेवा बंद राहणे हा चिंतेचा विषय ठरत आहे. जिओ कंपनीच्या तांत्रिक विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ही ‘निर्जीव’ झालेली सेवा त्वरित ‘सजीव’ करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
__*****_______****______
“आजच्या काळात वीज आणि पाण्याइतकीच इंटरनेटची गरज आहे. दोन दिवसांपासून आमचे बँकिंग व्यवहार आणि महत्त्वाची कामे रखडली आहेत. जिओने आपली सेवा लवकरात लवकर सुरळीत करावी, अन्यथा ग्राहकांना पर्यायी सिमकार्डचा विचार करावा लागेल.”
नरेंद्र सु. शिंदे
त्रस्त ग्राहक, फुलसावंगी.
