बिलोली प्रतिनिधी गणेश कदम
अटकळी (ता. बिलोली, जि. नांदेड) – येथील पीएम श्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, अटकळी येथे दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी महिला सबलीकरण व किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन या विषयावर विशेष व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला निवृत्त प्राचार्य श्री नागोराव गबाळे सर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात भारतातील पहिल्या महिला शिक्षिका व स्त्रीशिक्षणाच्या क्रांतीची प्रेरणास्थान असलेल्या Savitribai Phule यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री मारुती यांच्या हस्ते व्याख्याते नागोराव गबाळे सर यांचा सत्कार करण्यात आला.
गबाळे सरांनी इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना किशोरावस्थेत होणारे शारीरिक व मानसिक बदल, हार्मोनल चढउतार आणि त्यातून निर्माण होणाऱ्या प्रश्नांविषयी अत्यंत सोप्या व समजण्यासारख्या भाषेत मार्गदर्शन केले. “या बदलांना घाबरून न जाता आत्मविश्वासाने त्यांचा स्वीकार करावा आणि स्वतःच्या आरोग्याची नियमित काळजी घ्यावी,” असे त्यांनी सांगितले. प्रत्येक इंद्रियाचे महत्त्व, संतुलित आहार, स्वच्छता आणि सकारात्मक विचार याबाबतही त्यांनी विद्यार्थ्यांना उपयुक्त माहिती दिली.
महिला सबलीकरणाच्या दृष्टीने शिक्षणाचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी सांगितले की, “स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आणि समाजात सन्मानाने जगण्यासाठी मुलींनी शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे.” त्यांच्या प्रेरणादायी विचारांमुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आणि जागरूकता निर्माण झाल्याचे दिसून आले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री कलेटवाड सर, श्री भेलोंडे सर, श्री चव्हाण सर, श्री शहापूरकर सर, सौ. मुनेश्वर मॅडम, सौ. मुधाळे मॅडम, सौ. चालिकवार मॅडम, सौ. आइलवार मॅडम, सौ. वाघमारे मॅडम, सौ. मनीषा औरादे, श्रीनाथ पोलकमवाड तसेच श्री मल्लिकार्जुन पोलकमवाड व इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता आणि महिला सबलीकरणाबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला.
