दैनिक चालू वार्ता | रिसोड शहर प्रतिनिधी विजय जुंजारे
रिसोड : किडनी विकाराच्या रुग्णांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. आतापर्यंत रिसोड शहर व तालुक्यातील रुग्णांना डायलिसिससाठी अकोला किंवा छत्रपती संभाजी नगर येथे जावे लागत होते. त्यामुळे रुग्णांना आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत होता. मात्र आता रिसोड तालुक्यातच डायलिसिसची सुविधा लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
तालुक्यात किडनी आजारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून अनेक रुग्णांना आठवड्यातून दोन ते तीन वेळा डायलिसिस करावी लागते. बाहेरगावी जावे लागल्यामुळे वेळ आणि पैशांचा मोठा खर्च होत होता. ही अडचण लक्षात घेऊन स्थानिक स्तरावर डायलिसिस विभाग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महत्त्वाचे म्हणजे, वरील सर्व सेवा रिसोड ग्रामीण रुग्णालय येथे पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या ठिकाणी किडनी विकार तज्ञ (नेफ्रोलॉजिस्ट) यांच्या देखरेखीखाली रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
डायलिसिस विभागाबद्दल थोडक्यात माहिती
डायलिसिस ही अशी वैद्यकीय प्रक्रिया आहे ज्यामध्ये किडनी योग्य प्रकारे काम करत नसल्यास शरीरातील विषारी द्रव्ये व अतिरिक्त पाणी बाहेर काढले जाते. किडनी निकामी झालेल्या किंवा गंभीर आजाराने त्रस्त रुग्णांसाठी डायलिसिस ही जीवनावश्यक उपचार पद्धती आहे. यासाठी विशेष मशीन, प्रशिक्षित तंत्रज्ञ व तज्ञ डॉक्टरांची आवश्यकता असते.
रिसोड तालुक्यात ही सुविधा सुरू झाल्यानंतर रुग्णांना वेळेत उपचार मिळतील, प्रवासाचा त्रास कमी होईल आणि आरोग्य व्यवस्थेत मोठी सुधारणा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
तालुक्यातील नागरिकांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत असून लवकरात लवकर सेवा सुरू व्हावी, अशी मागणी होत आहे.
