दै. चालू वार्ता तलासरी प्रतिनिधी -सुधीर घाटाळ
तलासरी : मौजे काजळी (ता. तलासरी) येथील काजळी सामुदायिक शेती सहकारी संस्था मर्यादितमधील तत्कालीन पदाधिकाऱ्यांकडून सुमारे ७० लाख रुपयांची अफरातफर तसेच जमीन विक्री व्यवहारात गंभीर आर्थिक अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी तलासरी पोलीस ठाण्यात ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी फिर्यादी म्हणून सतिश भागवत नागटिळक (लेखापरीक्षक श्रेणी-२, अधिन जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग-२, सहकारी संस्था, पालघर) यांनी संस्थेचे लेखापरीक्षण केले होते. लेखापरीक्षणादरम्यान संस्थेच्या आर्थिक व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता आढळून आली. विशेषतः सुमारे ७० लाख रुपयांची अफरातफर तसेच जमीन विक्री व्यवहारात नियमबाह्य पद्धतीने आर्थिक अपहार झाल्याचे स्पष्ट झाले.
या निष्कर्षांनंतर नागटिळक यांनी तलासरी पोलीस ठाण्यात सविस्तर तक्रार अर्ज दाखल केला. तक्रारीच्या अनुषंगाने प्राथमिक चौकशी करण्यात आल्यानंतर तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ४९/२०२६ भारतीय दंड संहिता कलम ४२० (फसवणूक), ४०६ (विश्वासघात), ४०९ (विश्वस्ताकडून अपहार) व ३४ (सामूहिक हेतू)
अन्वये पुढील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे :1)उपेंद्र रामजी रॉय- तत्कालीन अध्यक्ष,2)रामजी रामचंद्र रॉय- तत्कालीन उपाध्यक्ष,3) रविंद्रकुमार हरीजन -ऊर्जा ग्लोबल प्रा. लि.
4) निमिष किर्तीकुमार शाह -मे. परफेक्ट असोसिएट्स,5)महुल रणजीतसिंग ठाकूर-नोटरी व्यवहारास मान्यता देणारे6)उमाकांत नानाजी चेटुले- अवसायक, काजळी सामुदायिक शेती सहकारी संस्था मर्या.7)अजय गुजराथी- तत्कालीन सहायक निबंधक, सहकारी संस्था डहाणू
सदर प्रकरणाचा पुढील तपास तलासरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय गोरड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, संबंधित व्यवहारांची सखोल छाननी केली जात आहे. या प्रकरणात आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
स्थानिक शेतकरी व सभासदांमध्ये संतापाची लाट उसळली असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. सहकारी संस्थेवरील विश्वासाला तडा देणाऱ्या या घटनेमुळे सहकार क्षेत्रात पारदर्शकतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
या प्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या तपास सुरू आहे. संबंधित कागदपत्रे व आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी केली जात आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर कायद्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल.
-अजय गोरड, तलासरी पोलीस निरीक्षक
