विजयकुमार जेठे खेड तालुका प्रतिनिधी : टाकळकर वाडी, राजगुरुनगर येथील मराठी शाळेचा विद्यार्थी आदित्य समीर कानवडे याची प्रतिष्ठित नवोदय विद्यालयाच्या प्रवेशासाठी निवड झाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अत्यंत स्पर्धात्मक अशा या परीक्षेत यश मिळवून आदित्यने आपल्या शाळेचे व गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.
नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा ही ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी मानली जाते. या परीक्षेत यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम, चिकाटी आणि योग्य मार्गदर्शन आवश्यक असते. आदित्यने याच गुणांच्या जोरावर हे यश संपादन केले आहे.
या यशामागे शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य आणि आदित्यची मेहनत यांचा मोठा वाटा आहे. टाकळकर वाडी मराठी शाळेनेही या यशामुळे आपली शैक्षणिक गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.
आदित्यच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग, ग्रामस्थ व विविध स्तरांतून त्याचे कौतुक होत असून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी त्याला सर्वांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
