आम आदमी पक्षाने खासदार राघव चड्ढा यांना राज्यसभेतील उपनेते पदावरून हटवल्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. त्यांच्या जागी आता खासदार अशोक मित्तल यांची राज्यसभेच्या उपनेते पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
मात्र, चड्ढा यांना अचानक या पदावरून का हटवण्यात आले, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
उपनेतेपदावरून हटवण्यात आल्यानंतर राघव चड्ढा यांनी ‘मला गप्प करण्यात आलं’ असा आरोप केला होता. त्यानंतर आम आदमी पक्षाच्या काही नेत्यांनीही त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. या पार्श्वभूमीवर चड्ढा यांनी एक व्हिडिओ शेअर करत पक्ष नेतृत्वावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.
‘माझ्या विरोधात एक पूर्वनियोजित मोहीम चालवली जात आहे. एकसारखेच प्रश्न आणि एकसारखेच आरोप माझ्यावर केले जात आहेत. हा योगायोग नाही, तर हा एक सुनियोजित हल्ला आहे,’ असे चड्ढा यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
व्हिडिओच्या शेवटी बोलताना ‘घायल हूं, इसलिए घातक हूं’ असे म्हणत त्यांनी आम आदमी पक्षाला इशारा दिला. तसेच पक्षाने केलेल्या तीन आरोपांनाही त्यांनी सडेतोड उत्तर दिल्याचा दावा केला आहे. या घडामोडींमुळे आम आदमी पक्षातील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले असून, येत्या काळात या वादाचे राजकीय परिणाम काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
