पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या पापांचा घडा भरला आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत सत्तापरिवर्तन अटळ आहे, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथे व्यक्त केला.
राज्याचा विकास सुनिश्चित करण्यासाठी ‘तृणमूलमुक्त बंगाल’चे आवाहनही मोदींनी केले.
पश्चिम बंगालमध्ये मोदी यांच्या गुरुवारी तीन सभा पार पडल्या. पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील हल्दिया या बंदर शहरातील सभेत मोदी म्हणाले, ज्यांनी बंगालला लुटले, त्यांचा हिशेब केला जाईल. मोदींनी ममता बॅनर्जी यांच्या प्रशासनाचा ‘निर्मम’ (क्रूर) सरकार असा उल्लेख या वेळी केला.
मत्स्यहारांच्या मुद्द्यावर बोलताना मोदींनी आरोप केला की, मासळीची मोठी मागणी असूनही तृणमूल सरकार उत्पादन वाढवण्यात अपयशी ठरले. गेल्या १५ वर्षांत राज्य सरकारने मासळी उत्पादनात स्वयंपूर्ण होण्यासाठी कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही.’
ममता बॅनर्जी यांचे मोदींना प्रत्युत्तर
कोलकाता : आपले सरकार मासे उत्पादनात स्वयंपूर्ण होण्यास अपयशी ठरल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दावा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी फेटाळून लावला. तसेच त्यांच्यावर तथ्ये चुकीच्या पद्धतीने मांडल्याचा आरोप केला. उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील आगरपाडा येथील जाहीर सभेत बॅनर्जी म्हणाल्या की, ‘मी ऐकले, आज ते (पंतप्रधान) म्हणाले बंगालमध्ये माशांचे उत्पादन होत नाही, तर बिहार जास्त उत्पादन आणि निर्यात करत आहे. पण तुम्ही बिहारमध्ये लोकांना मासे खाऊ देत नाही. येथे आम्ही बाजारातून मासे विकत घेतो आणि खातो.
