हिंजवडी-शिवाजीनगर या मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील मार्गिकेचे अनेक दिवसांपासून रखडलेले आहे. प्रशासनाकडून या कामासाठीची मुदत वाढवून देण्यात आली. या कामाचे कंत्राट टाटा समुहाकडे आहे.
मुळ मुदत उलटूनही अद्याप हिंजवड-शिवाजीनगर मेट्रो सुरू झाली नसल्याने राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. येत्या एक-दोन महिन्यांत या मार्गाचे काम पूर्ण होणे अपेक्षित असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
खडकवासला ते हडपसरमार्गे खराडी आणि नळ स्टॉप ते माणिकबाग-वारजे या मेट्रोच्या चौथ्या मार्गांना नुकतीच मंजुरी मिळाली. या प्रकल्पाबाबत जनजागृती करण्यासाठी ‘महामेट्रो’तर्फे ‘जनसंवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पाटील यांनी पुण्यातील वाहनांची वाढती संख्या आणि मेट्रोच्या कामांवर भाष्य केले. पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे संचालक (कार्य) अतुल गाडगीळ, नगरसेवक राजाभाऊ बराटे, पुनीत जोशी, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, रेश्मा बराटे, तेजश्री पवळे, माजी नगरसेवक सुशील मेंगडे आदी उपस्थित होते.
‘हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गाचे आतापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, टाटा समूहाकडे कंत्राट असूनही या कामाला विलंब झाला. मुदत ओलांडून गेली. मात्र, मेट्रो अद्याप सुरू झाली नाही, याचे आश्चर्यच वाटते,’ अशा शब्दांत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हिंजवडी-शिवाजीनगर मार्गिकेच्या रखडलेल्या कामाविषयी नाराजी व्यक्त केली. आता हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आले असून, येत्या एक-दोन महिन्यात हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गिका सुरू होणे अपेक्षित असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.
आता पुण्याच्या चारही बाजूंनी मेट्रोचा विस्तार होणार आहे. शहरातील रस्ते एका प्रमाणापेक्षा अधिक मोठे होऊ शकत नाहीत. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीलाच प्राधान्य द्यावे लागेल. त्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे,’ असेही चंद्रकांत पाटील यांनी नमूद केले.
‘पुण्याचा विस्तार वेगाने होत आहे. शहरी दळणवळणासाठी केवळ पायाभूत सुविधा नाही, तर मानसिकतेमध्येही बदल करणे आवश्यक आहे. पुणेकरांनी मेट्रोसाठी चारशे-पाचशे मीटर चालण्याची तयारी ठेवावी,’ असे आवाहन ‘महामेट्रो’चे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी केले. ‘मेट्रोच्या प्रत्येक स्थानकावर वाहनतळाची सुविधा उपलब्ध करून देणे शक्य नाही. मात्र, मेट्रो स्थानकापासून शेअर रिक्षा, बसची सोय उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.
श्रावण हर्डीकर म्हणाले, ‘पावसाळ्यानंतर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील एसएनडीटी-माणिकबाग आणि खडकवासला-हडपसर-खराडी मार्गाचे काम सुरू करण्यात येणार आहे. तसेच, वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली या मेट्रो विस्तारासाठी दोन्ही मार्गांवर नळस्टॉपप्रमाणे दुमजली उड्डाणपूल उभारले जाणार आहेत. या टप्प्याचे काम चार वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. सिंहगड रस्त्यावरूनच मेट्रो धावणार आहे. ती कॅनॉलवरून नेणे शक्य नाही.’
जमिनीच्या छोट्या तुकड्यांवरील इमारतींचा पुनर्विकास अवघड होणार असल्याने सामूहिक विकासाचा (क्लस्टर डेव्हलपमेंट) पर्याय स्वीकारण्याची गरज असल्याचेही हर्डीकर यांनी अधोरेखित केले.
दरम्यान, एसएनडीटी ते माणिकबाग मेट्रोचे काम कधी सुरू होणार, कर्वेनगरचा पूल पाडणार का, हाय टेन्शन वायरचे काय करणार, सिंहगड रस्त्यावरची मेट्रो रस्त्यावरूनच जाणार की कॅनॉलवरून असे विविध प्रश्न कर्वेनगर-वारजे-सिंहगड रस्ता परिसरातील रहिवाशांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना विचारले. तर आधी रखडलेले ‘डीपी’ रस्ते पूर्ण करा आणि मगच मेट्रो आणि सनसिटी कर्वेनगर पूल खुला करा, असा इशाराही दिला.
