व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली त्र्यंबकेश्वरमधे भाविकांची आर्थिक लूट होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश युवक कार्याध्यक्ष आणि मंदिर संस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांना अटक करण्यात आली आहे.
मंदिर प्रशासनातील एका जबाबदार पदावरील व्यक्तीलाच अटक झाल्याने या कारवाईमुळे राजकीय वर्तुळासह जिल्हाभरात खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, अनंता सुरेश मेहंदळे (वय ४६) हे नाशिकहून त्यांच्या मित्रासह शनिवारी (दि. ११) एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेले होते. त्यांनी २०० रुपयांचे देणगी दर्शन पास घेतले होते आणि रांगेत उभे असताना संशयित आरोपी गोटीराम मनाजी पेहरे (वय ४१, रा. खडकवाडी, ता. त्र्यंबकेश्वर) हा त्यांना भेटला. रांगेत दर्शन घेतले तर अधिक वेळ लागेल ‘दहा मिनिटांत व्हीआयपी दर्शन करून देतो’ असे आमिष दाखवत त्याने तीन हजार रुपयांची मागणी या भाविकांकडे केली.
दुसरा संशयित आरोपी अभिषेक कडलग (रा. त्र्यंबकेश्वर) याच्या मदतीने मंदिरात प्रवेश देऊन त्यांना दर्शन घडविण्यात आले. दर्शनानंतर मंदिराबाहेर आल्यावर आरोपीने फिर्यादीकडून तीन हजार रुपये रोख स्वरूपात घेतले. मात्र, मंदिर ट्रस्टकडून अशा प्रकारची कोणतीही अधिकृत व्हीआयपी सेवा नसतानाही कोणतीही पावती न देता ही रक्कम घेतल्याने फसवणूक झाल्याचे उघड झाले.
याप्रकरणी अनंता मेहंदळे यांनी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या प्रकरणात पोलिसांनी सर्वात आधी गोटीराम मनाजी पेहरे आणि पुरुषोत्तम कडलग यांचा पुतण्या अभिषेक कडलग या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांकडून गोटीरामला तत्काळ अटक करण्यात आली, तर अभिषेक कडलग सध्या फरार आहे.
तपासादरम्यान या संपूर्ण तिकीटाच्या काळाबाजार रॅकेटमध्ये विश्वस्त पुरुषोत्तम कडलगचा सहभाग असल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले. त्यानंतर सोमवारी रात्री पुरुषोत्तम कडलगला त्र्यंबकेश्वर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. अशा प्रकारे मंदिर ट्रस्ट विश्वस्तालाच अटक झाल्याने, या भ्रष्टाचाराचे मूळ थेट संस्थानच्या आतपर्यंत असल्याचे स्पष्ट झाले असून खळबळ उडाली आहे.
