पुन्हा समोरासमोर चर्चा; दुसऱ्या फेरीबाबत महत्वाची माहिती समोर…
अमेरिका आणि इराण यांच्यात पाकिस्तानमध्ये झालेल्या शांतता चर्चेची पहिली फेरी निष्फळ ठरल्यानंतर आता सर्व जगाचे लक्ष या चर्चेच्या दुसऱ्या फेरीकडे लागले आहे.
अमेरिका – इराण यांच्यात दोन आठवड्यांचा युद्धविराम घोषित केल्यानंतर इस्लामाबाद येथे चर्चेचे आयोजन करण्यात आले आहे. ११ एप्रिल रोजी झालेल्या चर्चेतून ठोस तोडगा न निघाल्याने अमेरिकेने आता होर्मुझ सामुद्रधुनीत नाकेबंदी केली आहे. दरम्यान, आता उभय देशांतील चर्चेच्या दुसऱ्या फेरीबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे.
याच आठवड्यात चर्चेची दुसरी फेरी?
रॉयटर्स या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, अमेरिका आणि इराणमध्ये शांतता चर्चेची दुसरी फेरी याच आठवड्यात होण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांचे शिष्टमंडळ चर्चेसाठी पुन्हा इस्लामाबादमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. या आठवड्याच्या अखेरीस उभय देशांत दुसऱ्यांदा चर्चा पार पडेल, असे रॉयटर्सने सूत्रांच्या हवाल्याने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात म्हटले आहे. या चर्चेची नेमकी तारीख अद्याप समोर आलेली नाही पण, आठवड्याच्या शेवटी चर्चा होण्याची संकेत वृत्तातून देण्यात आलेत.
तारीख अद्याप निश्चित नाही
‘शिष्टमंडळाने शुक्रवार ते रविवार चर्चेसाठी खुला ठेवला आहे पण, तारीख अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही’, अशी माहिती इराणच्या वरिष्ठ सूत्रांनी रॉयटर्सला दिली आहे. युद्धविरामाची घोषणा करण्यात आल्यानंतर गेल्या आठवड्यात अमेरिका आणि इराणचे शिष्टमंडळ इस्लामाबाद येथे शांतता चर्चेसाठी दाखल झाले होते. या चर्चेतून कोणताही निर्णायक तोडगा निघाला नाही. अमेरिकेच्या अण्वस्त्र कार्यक्रम पूर्णपणे रद्द करणे आणि होर्मुझ सुरक्षित खुली करणे या अमेरिकेच्या मुद्यांवर इराणी नेते सहमत नसल्याची माहिती समोर आली आहे.
चर्चेकडे जगाचे लक्ष
चर्चेच्या विषयाशी निगडीत पाकिस्तानी सूत्रांनी रॉयटर्सला दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही देशांच्या प्रतिनिधींबरोबर सध्या संवाद सुरु असून चर्चेची तारीख निश्चित केली जात आहे. शक्यतो या आठवड्याच्या शेवटी बैठक होण्याची शक्यता आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. चर्चा सुरु करण्यासाठी अमेरिका आणि इराणचे शिष्टमंडळ पुन्हा पाकिस्तानमध्ये दाखल होईल, असे रॉयटर्सने वृत्तात म्हटले आहे.
पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालय, लष्कर किंवा पंतप्रधानांचे कार्यालय तसेच व्हाईट हाऊसकडून यावर प्रतिक्रिया देण्यात आली नाही, असेही रॉयटर्सने स्पष्ट केले आहे. दरम्यान, अमेरिका आणि इराणमध्ये होणाऱ्या दुसऱ्या फेरीतील चर्चेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावेळी तोडगा निघणार का? युद्ध आणखी चिघळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
