इराणने आता पाच अरब देशांकडून युद्धात झालेल्या नुकसानाची भरपाई मागितली आहे. अमेरिका-इस्त्रायला इराणवर हल्ले करण्यासाठी भूभाग वापरण्यास परवानगी देणे आणि या संघर्षात त्यांना साथ देऊन अरब देशांनी चूक केल्याचे इराणने म्हटले आहे.
इराणच्या प्रेस टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, हल्ल्यांसाठी भूभागाचा वापर करु दिल्याबद्दल इराणने ५ अरब देशांविरुद्ध संयुक्त राष्ट्रांमध्ये निषेध नोंदवला. इराणकडून करण्यात आलेल्या हल्ल्यांमध्ये झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याची मागणी अरब देशांनी केली असता, इराणने ती धुडकावून लावत त्यांच्याकडूनच भरपाईची मागणी केली.
अरब देशांकडे नुकसान भरपाईची मागणी
प्रेस टीव्हीच्या वृत्तानुसार, बहरीन, सौदी अरेबिया, कतार, संयुक्त अरब अमिराती आणि जॉर्डन या देशांनी महासचिव अँटोनियो गुटेरेस आणि सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष जमाल फारेस अलरोवाई यांना उद्देशून पत्र लिहले होते. यात त्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली होती. पण, इराणचे राजदूत आणि स्थायी प्रतिनिधी अमीर-सईद इरावानी यांनी नुकसान भरपाईची मागणी फेटाळून लावली. ही राष्ट्रे इराणच्या विरोधात संयुक्त राष्ट्र सनदेच्या कलम ५१ (स्व-संरक्षणाचा अधिकार) कायदेशीररित्या लागू करू शकत नाहीत. या देशांनी अमेरिका-इस्रायलच्या आक्रमणाला मदत केली होती, असे इराणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
इराणवर आक्रमणासाठी भूभाग, हवाई क्षेत्राचा वापर
अमेरिका आणि इस्रायला आक्रमणासाठी सहकार्य केल्याचा ठपका ठेवत इराणला स्व-संरक्षणाचा अधिकार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. इराणमधील नागरिकांना लक्ष्य करण्यात आलेले काही हल्ले या देशाकडूनच करण्यात आल्याचा आरोपही इराणकडून करण्यात आला आहे. संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, कतार आणि कुवेत या देशांचा भूभाग आणि हवाई क्षेत्राचा इराणवर हल्ला करण्यासाठी वापर करण्यात आल्याचा आरोपही इराणने केला आहे. या पाच अरब देशांनी इराणविरोधातील कारवाई त्वरीत बंद करावी आणि भूभाग वापरण्यास मज्जाव करावा, अशी मागणी देखील इराणने केली आहे.
अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण संघर्ष
अमेरिका आणि इस्रायलने २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणविरोधात लष्करी कारवाई सुरु केली. पहिल्याच दिवशी केलेल्या हवाई हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. यानंतर इराणच्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचा देखील मृत्यू झाला. मिनाब येथील शाळेवर झालेल्या हल्ल्यात इराणच्या शालेय मुलांसह जवळपास १५० जणांचा मृत्यू झाला होता. अमेरिका आणि इस्रायलच्या या हल्ल्यांना इराणकडून देखील जोरदार प्रत्त्युतर देण्यात आले.
