एका महिन्यात तेल कमाई दुप्पट; कमावले १.५८ लाख कोटी रुपये…
सध्या सुरू असलेल्या मध्य-पूर्वेतील संघर्षामुळे जागतिक बाजारात तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने, रशियाच्या तेल आणि इंधन निर्यातीतून मिळणारा महसूल मार्च महिन्यात दुप्पटीच्या जवळ पोहोचला.
फेब्रुवारीमधील ९.७५ अब्ज डॉलर्सवरून (८१,००० कोटी रुपये) हा महसूल वाढून १९.०४ अब्ज डॉलर्स (१,५८,००० कोटी रुपये) इतका झाला, अशी माहिती आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेने (IEA) मंगळवारी दिली.
२०२२ मध्ये युक्रेन युद्धाला सुरुवात झाल्यानंतर रशियाचा तेल महसूल सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचला होता. मात्र, आता मध्य-पूर्वेतील संघर्षामुळे तेल वाहतुकीवर परिणाम झाला आणि रशियाने याचा योग्य प्रकारे लाभ उचलल्याने ही वाढ झाली. यावरून रशियाचा अर्थसंकल्प आणि वाढता लष्करी खर्च भागवण्यासाठी ऊर्जा निर्यातीचे महत्त्व आजही कायम असल्याचे अधोरेखित होते.
आयईएच्या मते, रशियाची कच्च्या तेलाची निर्यात मागील महिन्याच्या तुलनेत २,७०,००० बॅरल प्रति दिन वरून वाढून मार्चमध्ये ४६ लाख बॅरल प्रति दिन झाली. द्रुझ्बा पाइपलाइनमधून होणारा प्रवाह बंद असल्याने, ही वाढ प्रामुख्याने सागरी मार्गाने होणाऱ्या वाढीव वाहतुकीमुळे झाली.
प्रमुख पायाभूत सुविधांवर झालेल्या हल्ल्यांनंतर, जानेवारीच्या अखेरीपासून युक्रेनमार्गे हंगेरी आणि स्लोव्हाकियाला होणारी पाइपलाइन निर्यात स्थगित करण्यात आली आहे, असे या संस्थेने नमूद केले.
रशियाचे कच्च्या तेलाचे उत्पादनही फेब्रुवारीतील ८६.७ लाख बॅरल प्रति दिनवरून मार्चमध्ये ८९.६ लाख बॅरल प्रति दिनपर्यंत वाढले, असे आयईएने सांगितले.
पण, युक्रेनकडून सुरू असलेल्या हल्ल्यांमुळे बंदरे आणि ऊर्जा पायाभूत सुविधांचे झालेले नुकसान नमूद करत, रशियाला नजीकच्या काळात उत्पादन आणखी वाढवण्यात अडचणी येऊ शकतात, असा इशारा या संस्थेने दिला आहे.
दररोज अंदाजे १ कोटी बॅरल्स तेलाचा तुटवडा
हॉर्मुझ सामुद्रधुनीच्या संदर्भात सुरू असलेल्या संकटामुळे, तेलाचे दर २०० डॉलर्स प्रति बॅरलपर्यंत पोहोचू शकतात. जर पुढील दोन महिने ही परिस्थिती अशीच कायम राहिली, तर तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. S&P Global Energy चे ‘इंडिया कंटेंट हेड’ पुलकित अग्रवाल यांनी CNBC TV18 ला सांगितले की, तेलाच्या बाजारातील स्थिती अत्यंत अस्थिर असून, परिस्थिती कशा प्रकारे वळण घेते यावर अवलंबून विविध शक्यता निर्माण होत आहेत. त्यांनी असेही नमूद केले की, जर सध्याची परिस्थिती अशीच कायम राहिली, तर तेलाचे दर वेगाने वाढू शकतात.
अग्रवाल यांनी सांगितले की, यापूर्वी या सामुद्रधुनीतून दररोज अंदाजे १५० जहाजांची वाहतूक होत असत, परंतु आता ही संख्या घटून ८ ते १० वर आली आहे. त्यांनी पुढे नमूद केले की, अगदी किरकोळ व्यत्ययाचाही जागतिक पुरवठ्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. सध्या, तेलाच्या बाजाराला दररोज अंदाजे १ कोटी (१० दशलक्ष) बॅरल्सच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. परिणामी, विविध देशांना मागणीवर निर्बंध घालून ही परिस्थिती हाताळावी लागत आहे.
